नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा ठेका बीड येथील चिंतेश्वर कन्स्ट्रक्शन या मोटार वाहतूक संस्थेला दिलेला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या संस्थेकडून टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र, या संस्थेकडून निविदेतील अटी व शर्तीचे पालन केले जात नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. टँकरच्या वेळेवर खेपा करा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देखील दिला आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच पाथर्डी तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाई निर्माण झाली. त्यानंतर ही संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची निविदा मागविण्यात आली होती.
सर्वाधिक कमी दर असल्यामुळे यंदाचा टँकरचा ठेका चिंतेश्वर कन्सट्रक्शन या संस्थेला मिळालेला आहे. या संस्थेच्या माध्यमातून जिल्हाभरातील टंचाईग्रस्त गावांना मोफत पाणीपुरवठा केला जात आहे. आजमितीस या संस्थेच्या 331 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे.
या टँकरच्या दैनंदिन कामावर जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष ठेवत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरच्या दररोजच्या खेपा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. टँकर नादुरुस्त झाल्यास तत्काळ दुसर्या टँकरचे नियोजन करुन संबंधित गावाला टँकरव्दारे पाणीपुरवठा पुरविणे बंधनकारक आहे. मात्र, या संस्थेकडून खेपा वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत. टँकर नादुरुस्त झाल्यास तत्काळ दुसरा टँकर उपलब्ध होत नाही, असे जिल्हा परिषद प्रशासनाला आढळून आले आहे.
या संस्थेचे काम समाधानकारक नसल्याचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाने पाठविला. या अहवालानुसार जिल्हा प्रशासनाने या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वेळेवर खेपा न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देखील या संस्थेला नोटीसव्दारे दिला आहे.या संस्थेच्या टँकरचालकांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देखील जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना दिले आहेत.
आजमितीस या संस्थेच्या वतीने 331 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईग्रस्त गावांना ठरवून दिलेल्या खेपा वेळेवर होत नाहीत. अशा विविध कारणामुळे यापूर्वी देखील या संस्थेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. आतापर्यंत या संस्थेवर जवळपास साडेतीन ते चार लाखांची दंडात्मक कारवाई देखील करण्यात आलेली आहे.
पाथर्डी तालुका : सार्वजनिक हातपंपावर पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना कळवंडी गावात घडली आहे. मंगळवारी (दि. 28) दुपारी घडलेल्या या घटनेबाबत महिलेच्या फिर्यादीवरून गावातील कडूचंद शहाराम शेटे व रामकिसन निवृत्ती शेटे या दोघांविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. 29) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे, की फिर्यादी व एक महिला ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक हातपंपावर पाणी भरून परतत असताना कडूचंद शेटे, रामकिसन शेटे आले व जातिवाचक बोलून 'शासनाच्या टँकरचे पाणी घरी येते. तुम्ही येथे पाणी भरायला यायचे नाही.' असे म्हणून कडूचंद शेटे याने मारहाण केली. दुसरी महिला मध्ये पडली असता, रामकिसन शेटे यांनी त्यांनाही धमकावले. नंतर 'तुमच्याकडे पाहून घेऊ,' अशी धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा