अहमदनगर

नगर : मुले पिंजर्‍यात, कुत्री मोकाट; कारवाई न केल्यास महासभेत खाली बसणार

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरात मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या वाढल्या असून, लहान मुलांना खेळण्यासाठी बाहेर सोडणे अवघड झाले आहे. मुलांचे बालपणच हिरावले जात आहे. कुत्री पकडण्याची यंत्रणाच महापालिकेकडे नाही. मुलांपेक्षा कुत्र्यांचा जीव अधिकार्‍यांना महत्त्वाचा वाटतो. येत्या आठ दिवसांत मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम सुरू न केल्यास महापालिकेच्या महासभेत खाली बसू, असा इशारा स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी आज दिला.

महापालिका स्थायी समितीची सभा सभापती कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक मुदस्सर शेख, नजीर शेख, सुनील त्र्यंबके, सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, नगरसेविका रूपाली वारे, ज्योती गाडे, मंगल लोखंडे, कलमताई सप्रे, सुनीता कोतकर, पल्लवी जाधव, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त सचिन बांगर, श्रीनिवास कुर्‍हे आदी उपस्थित होते. मोकाट कुत्री लहान मुलांसह पादचार्‍यांवर हल्ले करीत आहेत.

शहरातील मोकाट कुत्री पकडण्यासाठी यंत्रणाच नसल्याचे सांगत, प्रभाग एकमधील नगरसेवकांनी सुरुवातीलाच प्रशासनाला मोकाट कुत्र्यांच्या दहशतीची प्रतिकृती भेट दिली आणि प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी चर्चेत रूपाली वारे, संपत बारस्कर, सुनील त्र्यंबके, विनीत पाऊलबुद्धे, मुद्दसर शेख आदींसह सर्वांनी सहभाग घेतला. अखेर आठ दिवसांत मोकाट कुत्र्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली. सभेला वेळेत उपस्थित न राहणार्‍या अधिकार्‍यांना सभापती गणेश कवडे यांनी समज दिली. सभेला हजर न राहिल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.

मुलांना खेळायला सोडणे जीवघेणे

महापालिका मोकाट कुत्री पकडण्यासाठी व शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. मात्र, कुत्र्यांची संख्या कमी झाली नसून ती वाढलीच आहे. मोकाट कुत्री एकत्र येऊन नागरिकांवर हल्ले करीत आहेत. यापूर्वी शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा दुर्दैवी मृत्यूदेखील झाला आहे. कुत्र्यांच्या झुंडीमुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे, असे नगरसेविका वारे म्हणाल्या.

अधिकार्‍यांच्या घरी कुत्री सोडू

मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी अधिकारी नाहीत. उपायुक्तांना काहीच माहिती नाही. मग काय अधिकारी येईपर्यंत सभा थांबवावी का, असा सवाल कवडे यांनी केला. स्थायी समितीला उपस्थित न राहणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल. अधिकारी मनमानी करीत असल्यास अधिकर्‍यांच्या घरी सोडू, असे सभापती कवडे म्हणाले.

कुत्र्यांची संख्या वाढली कशी

सावेडी उपनगरात प्रचंड प्रमाणात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मनपाकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले. मग, कोणत्या कुत्र्याचे कान कापले. कुत्री आली कोठून हे जर अधिकार्‍यांना सांगता येत नसेल, तर अधिकार्‍यांना निलंबित करा, अशी मागणी सुनील त्र्यंबके यांनी केली.

संबंधितांचे निलंबन करा

30 जूनला संबंधित संस्थेचा करार संपला. त्याअगोदर निविदा प्रक्रिया का केली नाही, असा सवाल उपस्थित केल्याने कोंडवाडा विभागाचे प्रमुख डॉ. राजूरकर यांची बोलती बंद झाली. निर्बीजीकरण केल्याने कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐजवी वाढली कशी, असा सवाल नगरसेवक मुदस्सर शेख यांनी उपस्थित केला.

पगाराइतके काम करा

शहरात गेल्या पाच वर्षांपासून मोकाट कुत्री पकडण्यासाठी संस्थेला ठेका देण्यात आला होता. माळीवाडा येथील कुत्री सावेडी उपनगरात सोडली जातात, तर सावेडी उपनगरातील कुत्री मुख्य शहरात आणून सोडली जातात. केवळ कागद रंगवून बोगस बिले काढली जात असल्याचा आरोप करीत अधिकार्‍यांनी पगाराइतके तरी काम करावे, असा टोला विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी लगावला.

उपायुक्त बांगर यांना निलंबित करा

कोंडवाडा विभागाचा चार्ज उपायुक्त सचिन बांगर यांच्याकडे आहे. आतापर्यंत कधी कुत्री पकडली, मोकाट कुत्री पकडणार्‍या संस्थेचा करार कधी संपला, अशी विचारणा केली असता बांगर निरुत्तर झाले. बांगर यांना उत्तरे देता न आल्याने त्यांना निलंबित करा, अशी मागणी विनीत पाऊलबुद्धे यांनी केली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT