अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या 3054 लेखाशीर्षाखाली झालेल्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया रद्द कराव्यात, या मागणीसाठी काल (सोमवारी) जिल्हा परिषद आवारात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले. सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासन व आंदोलकांमध्ये बोलणी सुरूच होती.
आम आदमी पक्षाचे सचिव प्रवीण तिरोडकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद आवारात उपोषण सुरू केले. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, जिल्हा नियोजन समितीने मंज़ुरी दिलेल्या लेखाशीर्ष 3054 अंतर्गत कामाची निविदा प्रक्रिया सदोष आहे. नेवासा तालुक्यातील मंजूर कामांच्या निविदा प्रक्रियेचे उदाहरण घेतल्यास ज्या ठेकेदारांनी 12 टक्क्यांपेक्षा कमी दराने निविदा भरलेली असताना त्यांची नामंजूर करून ज्या ठेकेदारांनी 5 ते 6 टक्के कमी दराने निविदा भरल्या, त्यांच्या मंजूर केेल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
निविदा भरतेवेळी मागील वर्षी त्यांच्या नावावर असलेले काम पूर्ण झालेले नाही, डिजिटल स्वाक्षरी नाही, कागदपत्रे क्रमवारीत नाहीत, यांत्रिकी व डांबर प्लँटचे करार योग्य नाहीत, यांत्रिकी विभागाचे प्रमाणपत्र वैध नाही, इत्यादी कारणे देवून या निविदा अपात्र ठरविण्यात आल्याचेही उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
तर ज्या निविदा मंजूर झाल्या, त्यातील एका ठेकेदाराचे करारपत्र जुने आहे, ड्रममिक्स प्लँटच्या प्रमाणपत्रात छेडछाड केली आहे. जेसीबी, ट्रॅक्टरचा करारनामा संपलेला असल्याचेही तक्रारीतून नमूद करण्यात आलेले आहे. तसेच शेख या ठेकेदारासही बीड कॅपिसीटीपेक्षा जास्त कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे 3054 लेखाशीर्षातील संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करावी, अन्यथा पुराव्यानिशी आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असाही इशारा उपोषणकर्ते तिरोडकर यांनी दिला आहे.
हेही वाचा