अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यात बायोडिझेलसदृश तेलविक्रीचे रॅकेट; सहा हजार लिटर तेल जप्त

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी डिझेलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑईल व बायोडिझेलची अवैध विक्री करण्यात येत आहे. नगर-पुणे रस्त्यावरील कामरगाव शिवारातील एका बंद हॉटेलवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या पथकाने छापा मारून सुमारे सहा हजार लिटर बायोडिझेलसदृश तेलाचा साठा जप्त केला. या कारवाईत 29 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सोमनाथ मुरलीधर बळी (वय 47, रा. सारसनगर), कृष्णा ताराचंद राऊत (वय.25, रा. सावेडी), खंडू काकासाहेब गोरडे (वय 23, रा. बालम टाकळी, ता. शेवगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देवीदास जाधव व भरत कांडेकर (दोघे रा. अहमदनगर) पसार झाले. या पाच आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

कामरगाव शिवारातील हॉटेल यशच्या परिसरात दोन ट्रक व पिकअपमध्ये बायोडिझेलसदृश तेल असल्याची माहिती मिळाल्यानंतर बी. जी. शेखर यांच्या पथकाने शनिवारी (दि. 26) रात्री साडेदहा वाजता तेथे छापा टाकला. त्यात 4 लाख 75 हजार 410 रुपये किमतीचे 6 हजार 95 लिटर बायोडिझेलसदृश तेल जप्त केले. तसेच, दोन ट्रक व एक टेम्पो असा 29 लाख 34 हजार 910 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख करीत आहेत.

लिटरला 78 रुपयांचा भाव

इंधन दरवाढीच्या काळात वाहनचालकांना डिझेलच्या नावाने बायोडिझेल व इंडस्ट्रियल ऑईलची विक्री सर्रास सुरू आहे. महामार्गावर अवैधरीत्या बायोडिझेल व इंडस्ट्रियल ऑईलची विक्री करणारे रॅकेट चालविणार्‍यांची गाडी सुसाट सुरू आहे. 78 रुपये लिटर दराने बायोडिझेलसदृश तेल व इंडस्ट्रियल ऑईलची विक्री सुरू असल्याचे या छाप्यामुळे उघड झाले आहे.

बायोडिझल, इंडस्ट्रियल ऑईल विक्रीवर बंदी

बायोडिझेल व इंडस्ट्रियल ऑईल वाहनांमध्ये वापरल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे शासनाने त्यावर बंदी घातली आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये वापरण्यात येणारे बायोडिझेल व इंडस्ट्रियल ऑईल कमी किमतीत मिळत असल्याने डिझेलला पर्याय म्हणून मोठ्या वाहनांमध्ये अवैधरित्या याचा वापर होतो

हेही वाचा

SCROLL FOR NEXT