अहमदनगर

नेवासा : भागवत कथा सोहळ्याची सांगता

अमृता चौगुले

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आयोजित श्रीमद भागवत कथा सोहळ्याची रविवारी दि.30 जुलै सांगता झाली. भास्करगिरी महाराजांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले की, भगवंतांचे चरित्र अगाध आहे. भागवत कथा ऐकताना ती कानापासून मनापर्यंत जाण्यासाठी मन स्थिर असणे आवश्यक आहे.

कथा कीर्तनाने भगवंताबद्दल असलेला अंतर्भाव वृद्धिंगत होतो. मनाचे परिवर्तन करण्यासाठी कथा असल्याने भगवंताच्या, गुरूंच्या नामाने मनुष्य जीवाला आधार मिळतो. हरिनामाच्या चिंतनाने पैलतीर पार करता येतो. म्हणून परमार्थ श्रद्धेने व आवडीने करा.प्रत्येक जीव हा शिवरूप होण्यासाठी जीवनात भगवंतांचे नामस्मरण करा. भगवंताबद्दल असलेला भाव वृद्धिंगत होण्यासाठी होणार्‍या सत्संगाच्या कार्यक्रमांना नेहमी येत रहा, असे आवाहन त्यांनी केले

यावेळी त्रिवेणीश्वरचे रमेशानंदगिरी महाराज, दिनकर महाराज मते, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, रविराज गडाख, रामनाथ महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे, पंढरीनाथ महाराज मिस्तरी, गिरीजीनाथ महाराज जाधव, दादा महाराज साबळे, बाळू कानडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवगडच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेली काल्याची दहिहंडी भास्करगिरी महाराज व प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते फोडण्यात आली.

आपल्या संस्कृतीचे जतन करा

माणसे कायद्याला कायदा मानतात. परंतु, साधू-संत कायद्याला देव मानतात. तीर्थ यात्रेकडे पर्यटन म्हणून पाहू नये. आपल्याला संस्कार व संस्कृती हेच मोठे करतात. म्हणून संस्कृतीचे जतन करा. भारत भूमीबद्दलचे प्रेम कमी होऊ देऊ नका, असे आवाहन भास्करगिरी महाराजांनी यावेळी केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT