अहमदनगर

रस्ताकाम बंदच्या निषेधार्थ भीक मागो : ढाकणे यांचे आमदार राजळेंना आव्हान

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : दोन ठेकेदारांच्या वादातून एका ठेकेदाराने काही तरुण पाठवित दुसर्‍या ठेकेदाराचे काम बंद पाडले. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली भीक मांगो आंदोलन करत, पालिकेतील मुख्याधिकार्‍यांच्या दालनातल्या खुर्च्यांची मोडतोड केली. विकासकामांत होत असलेल्या टक्केवारीच्या घोळाच्या निषेधार्थ मंगळवारी अ‍ॅड. ढाकणे आक्रमक होत, आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता त्यांच्यासह सत्ताधारी पालिकेच्या माजी पदाधिकार्‍यांना टीकेचे लक्ष्य केले.

या आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख, आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, चांद मणियार, देवा पवार, चंद्रकांत भापकर, योगेश रासने, सीताराम बोरुडे, दिगंबर गाडे, आतिश निर्‍हाळी, भाऊसाहेब धस, जालिंदर काटे, सागर इधाटे, नागनाथ गर्जे, सुनील पाखरे, अविनाश टकले आदी उपस्थित होते.
विकासकामांत टक्केवारी मागणार्‍यांसाठी ढाकणे यांनी भीक मागो आंदोलन करत शहरातील प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यावसायिकाकडून एक रुपया जमा करून जमा झालेली 750 रुपयांची रक्कम नगरपालिकेला दान करण्यात आली.

शहरातील नवी पेठ येथील रस्त्याचे काम बंद पडल्यामुळे नागरिक व व्यावसायिकांची अडचण निर्माण झाली आहे. अशा भ्रष्ट टक्केवारीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. नगरपरिषदेमध्ये आंदोलनकर्ते आल्यानंतर मुख्याधिकारी नसल्याने सक्षम अधिकार्‍याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. संतप्त झालेल्या ढाकणे यांच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या इमारतीवरून मुख्याधिकारी संतोष लांडगे यांची खुर्ची खाली फेकून दिली, तसेच दालनातील प्लास्टिकच्या खुर्च्यांचीही मोडतोड केली. यावेळी ढाकणे म्हणाले की, बाराशे कोटींच्या विकासकामांच्या जाहिराती केल्या. त्यातील किती पैसे तुमच्या खिशात गेले, याचा हिशेब द्यायला तयारी असून, ते सिद्ध करून देतो.

गेल्या एक वर्षापासून मतदारसंघातील बाराशे कोटींचा विकासकामांचा हिशेब आमच्या बहिणाबाईला मागतोय, त्या देत नाही. त्यांची हिंमत होत नाही. आम्ही काही बोललो की विरोधकांना टीका करण्याशिवाय काय काम? असे मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी म्हणतात. मग आता हे टक्केवारीचे पाप कुणी केले. मार्च एंड येताच मुदतीत काम करायचं आणि बिल काढायचा धंदा तालुक्यात जोरात सुरू असून, त्याच्या नादात निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. असा एक रस्ता दाखवा का तो आजही चांगल्या दर्जाचा असून, सुस्थितीत आहे. तुम्ही म्हणाल ती शिक्षा घ्यायला तयार आहे, असे आव्हान ढाकणे यांनी आ. राजळे यांना दिले.

मूठभर तुमच्या बगलबच्चांना हाताशी धरून वाटेल तशा पद्धतीची ठेकेदारी सुरू असून, एकूण रकमेच्या वीस ते पंचवीस टक्क्यांतच कामे केली जातात. बाकीची रक्कम जाते कुठे? भ्रष्टाचाराने बंधारे, रस्ते निकृष्ट झाले आहेत. लोकशाहीतील लोकप्रतिनिधी टक्केवारीत रमत असेल तर त्या मतदारसंघाचे भले होणार नाही, असे ढाकणे यांनी सांगितले.

रस्ताकाम आजपासून सुरू होणार

नवी पेठ येथील बंद पडलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी बुधवारपासून काम सुरू करण्याचे आश्वासन अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांना दिले. या संदर्भात ढाकणे यांनी लांडगे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कामाबाबत विचारणा केली होती.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT