लहू कानडे माझ्यासोबत विधानमंडळात हवेत : आ. बाळासाहेब थोरात pudhari photo
अहमदनगर

लहू कानडे माझ्यासोबत विधानमंडळात हवेत : आ. बाळासाहेब थोरात

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपुर : पुढारी वृत्तसेवा ; आ. लहू कानडे यांनी पाच वर्षात केलेली विकास कामे त्यांच्या जनकार्य अहवालात सामावली आहेत. त्यांनी स्वतःचे कौशल्य वापरून विकास कामांसाठी निधी आणून कामे केली. त्यासाठी मोठी धडपड केली. साहित्यिक, लेखक, प्रशासकीय कामाचा अनुभव तसेच विकास कामांचा ध्यास असलेले आ. कानडे माझ्यासोबत विधानसभेत असणे आवश्यक आहे, असे मत विधान मंडळाचे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने पदाधिकाऱ्यांच्या संकल्प मेळावा पार पडला. यावेळी आ. कानडे यांच्या २०१९-२०२४ या कार्यकाळातील जनकार्य अहवालाचे तसेच त्यांनी लिहिलेल्या पाच पुस्तकांचे प्रकाशन आ. थोरात, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सुधीर तांबे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष लताताई डांगे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितलभैया वाबळे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक अमृत धुमाळ, माजी नगरसेवक अंजुम शेख, रवींद्र गुलाटी, राजेश अलग, मुख्तार शहा, विजय शेळके, कलीम कुरेशी, प्रकाश ढोकणे, मोहम्मद शेख, सलीम शेख, भाऊसाहेब मुळे, मल्ल शिंदे, प्रा. कार्लस साठे, समीन बागवान, श्रीरामपूर विधानसभा पक्ष निरीक्षक मधुकरराव नवले आदी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, लेखक व प्रशासनातील अधिकारी राजकारणात येऊन समाजाचे दुःख समजावून घेऊन त्यांचे प्रश्न कसे सोडवता येतात, त्याचे उत्तम उदाहरण आ. कानडे आहेत. त्यांनी सुंदर पुस्तकांची निर्मिती केली आहे. पाच वर्षातील कार्यकाळाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता येण्यासाठी या पक्षाचे आमदार अधिक असणे आवश्यक असून त्यासाठी आ. कानडे हे आपल्यासोबत असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

आ. कानडे म्हणाले, तालुक्यातील जनतेने २०१९ साली मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आपण ती जबाबदारी मानली. या कार्यकाळात आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रामाणिकपणे काम केले. मतदारांसमोर केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे, ही भूमिका घेऊन आपण अहवाल प्रकाशित केल्याचे नमूद केले. साहित्यीक कांबळे, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष लताताई डांगे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक माजी नगरसेवक अंजुम शेख, वळदगावचे सरपंच अशोक भोसले, अमृत धुमाळ, सचिन ब्राह्मणे, मल्ल शिंदे, शिवाजी गांगुर्डे, विष्णुपंत खंडागळे, अनिल ढोकचौळे, दवणगावच्या खपके यांनी मनोगतातून आ. कानडे यांनी केलेल्या विकास कामांचे कौतुक केले.

अॅड. समीन बागवान यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महिला तालुकाध्यक्षपदी प्रीतीताई जगताप यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना आ. थोरात यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

आ. कानडे यांचे शक्तीप्रदर्शन

विधान मंडळाचे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये आ. लहू कानडे यांच्या निवडणूकपूर्व कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा म्हणजे प्रचंड मोठे शक्तीप्रदर्शनच होते. दस्तूरखुद्द विधिमंडळ पक्षाचे नेते आ. थोरात यांची उपस्थिती व त्यांच्याच हस्ते आ. कानडेंचा जनकार्य अहवाल प्रकाशित करण्यात आल्याने श्रीरामपुरच्या उमेदवारीच्या चर्चेवर पडदा पडल्याचे बोलले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT