अहमदनगर

खडकीत एटीएम फोडण्याच्या प्रयत्न; कटर मशीन बंद पडल्याने वाचले दोन लाख

Laxman Dhenge

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : एटीएम केंद्राच्या बाहेरील व आतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारत, कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, ऐनवेळी कटर मशीन बंद पडल्याने एटीएम मधील दोन लाखांची रोकड वाचली आहे. चोरट्यांचा हा सर्व उद्योग सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नगर-दौंड महामार्गावर खडकी (ता.नगर) गावात असलेल्या वक्रांगी कंपनीच्या एटीएम केंद्रावर शनिवारी (दि.9) पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

याबाबत एटीएम केंद्र चालक प्रवीण रावसाहेब काळे (रा.सारोळा कासार, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी काळे यांचे सारोळा कासार व खडकी, अशा दोन ठिकाणी वक्रांगी कंपनीचे एटीएम आहेत. शनिवारी (दि.9) सकाळी आठच्या सुमारास त्यांनी मोबाईल चालू करून दोन्ही एटीएमचे कॅमरे पाहिले असता त्यांना खडकी येथील एटीएमला असणारे कॅमरे बंद दिसले. तेव्हा त्यांनी खडकी येथील सीसीटीव्ही ऑपरेटर श्रीकांत कोठुळे यांना फोन करून एटीएममधील कॅमेरे बंद असल्याचे सांगितले. तेथे जाऊन काय झाले आहे, हे पाहण्यास सांगितले.

त्यानंतर श्रीकांत कोठुळे हे एटीएम केंद्रात गेले. त्यांनी काळे यांना फोन करून एटीएमचा दरवाजा उघडा असून, कॅमर्‍यावर स्प्रे मारलेला आहे, असे सांगितले. ही माहिती मिळताच काळे हे लगेच खडकी येथे गेले. त्यांना एटीएमचा दरवाजा उघडा व सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारलेला दिसला. त्यानंतर त्यांनी रात्रभराचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. पहाटेच्या सुमारास तीन चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याबाबत त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फोन करून माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक युवराज चव्हाण पथकासह तेथे आले. त्यांनी पाहणी करत पंचनामा केला. याबाबत प्रवीण काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा झाला एटीएम फोडण्याचा प्रयत्न

खडकी येथे जिल्हा बँक शाखा इमारतीच्या गाळ्यात हे एटीएम आहे. शनिवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास एक कार तेथून काही अंतरावर येऊन थांबली. कारमधून तोंडाला फडके गुंडाळलेले तीन जण खाली उतरले व एक जण कारमध्येच बसून राहिला. तिघे एटीएम जवळ आले व त्यातील एकाने एटीएम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. नंतर सर्वजण आत गेले. आतील एका कॅमेर्‍यावर स्प्रे मारला. त्यानंतर कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी उडालेल्या ठिणग्या सीसीटीव्हीत दिसून आल्या.

त्यानंतर काही वेळातच एटीएममधील वीजपुरवठा खंडित झाला. बहुदा चोरट्यांनी एटीएममधील इनव्हरर्टरच्या बॅटरीला कटर मशीन जोडले असावे. त्यामुळे त्यावर लोड येऊन ते ट्रीप झाले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. कटर मशीन बंद पडल्याने चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला व ते तेथून निघून गेले. त्यावेळी एटीएममध्ये दोन लाखांची रोकड होती, असे फिर्यादी प्रवीण काळे यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT