शेवगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : दोन जणांची निर्घृण हत्या करून चोरी करणार्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने 48 तासांत मुसक्या आवळल्या. बलदवा कुटुंबातील दोघांचा खून करणार्या आरोपीला रविवारी(दि.25) अटक झाली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. खेडकर टाबर चव्हाण (वय 32, रा.म्हारोळा बिडकीन, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. चव्हाण हा चार महिन्यापूर्वीच तुरुगांतून सुटून बाहेर आला होता, असे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शुक्रवारी पहाटे मारवाड गल्लीमध्ये गोपीकिसन उर्फ दगडूशेठ गंगाबिसन बलदवा (वय 55) व पुष्पा हरिकिसन बलदवा (वय 60) या दोघांची डोक्यात वार करून हत्या करण्यात आली होती. तर, सुनिता गोपीकिसन बलदवा यांना विटेने मारहाण करुन जखमी केले होते. घरातून पाच लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला होता. शेवगाव पोलिसांचे एक व एलसीबीची तीन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली.
पोलिसांना हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपी हा खेडकर टाबर चव्हाण असून, तो गावी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांना मिळाली. एलसीबीच्या पथकाने खेडकर टाबर चव्हाण याला म्हारोळा बिडकीन (ता.पैठण) येथून अटक केली. अपर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक सुनिल पाटील, पर्यवेक्षाधीन सहा. पोलिस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.
खेडकर टाबर चव्हाण याच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोक्का, दरोडा, खून असे सात गुन्हे दाखल आहेत. चव्हाण हा सुरवातीला रेकी करायचा आणि सहज जाता येईल, अशा घरात चोरी करण्यासाठी एकटा शिरायचा. कोणी प्रतिकार केल्यास शस्त्राने जीवे मारायचा ही त्याची कार्यपध्दती आहे.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे, हेमंत थोरात, सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, विजय वेठेकर, दत्तात्रय गव्हाणे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोंढे, संदीप दरंदले, संदीप चव्हाण, फुरकान शेख, रवींद्र घुंगासे, अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, जालिंदर माने, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, संदीप पवार, उमाकांत गावडे, भरत बुधवंत, अरुण मोरे, बाप्पासाहेब धाकतोडे यांनी ही मोहीम पार पाडली.
शेवगावमधील दुहेरी हत्याकांडानंतर शहर बंद ठेवण्यात आले होते. आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी सकल माहेश्वरी समाज, विविध पक्ष-संघटना व ग्रामस्थांच्या वतीने तहसिल कार्यालयावर मुक मोर्चाही काढण्यात आला होता. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने आरोपीला अटक करण्यासाठी रात्रंदिवस तपास केला. त्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रविवारी पोलिसांना यश आले.
हेही वाचा