पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा : येथे उभारण्यात येणार्या शिवस्मारक व छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा बसवण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष दत्ता धनवटे यांनी दिली. प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 12 लाख रुपये खर्च करून धनवटे वेस ( मुख्य वेसीचे ) बांधकाम करून सुशोभीकरण केले. येथे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारावा, असा संकल्प ग्रामस्थांसह कार्यकर्त्यांनी मांडला होता. यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व सर्व धर्मियांचा सहभाग घेत शिवस्मारक समिती स्थापन करण्यात आली.
शिव स्मारक व छत्रपतींच्या पुतळ्यास सुमारे 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. लोकवर्गणीतून सुमारे 40 लाख रुपये रक्कम जमा झाली. एकूण 55 लाख रुपये रक्कम जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीला प्रशासकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळवण्यास सर्व पूर्तता केल्याचे धनवटे यांनी सांगितले. सुमारे 26 लाख रुपये किमतीचा छत्रपतींचा भव्य अश्वारूढ पुतळा छत्रपती संभाजीनगर येथे तयार करण्यात आला. पुतळ्याला कलाकारांकडुन शेवटचा हात फिरवला जात आहे. लवकरच पुतळा येथे आणला जाणार असल्याचे डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, विजय धनवटे, सुधाकर जाधव, मुरलीधर थोरात, सुभाष कुलकर्णी, अमोल सराळकर, प्रताप वहाडणे, शैलेश कुलकर्णी आदींनी सांगितले.
हेही वाचा :