सोनई (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : येथून जवळच असलेल्या नवनाथनगर शिवारातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला चार तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे. नवनाथनगर शिवारातील बाबासाहेब दरंदले यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. ग्रामस्थ व सोनई सोसायटीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब निमसे यांनी तातडीने वन विभागास घटनेची माहिती दिली. कर्मचारी येईपर्यंत ग्रामस्थांनी विहिरीत बाज सोडून रात्रभर तडफड करीत थकलेल्या बिबट्यास आधार दिला. त्यानंतर वनपाल देविदास पातारे, वनरक्षक मनेश जाधव, राहुल शिसोदे, कर्मचारी चांगदेव ढेरे, ज्ञानदेव गाढे व सयाजी मोरे आदी घटनास्थळी आले. अंमळनेर येथून पिंजरा आणण्यात आला.
वन विभागाच्या कर्मचार्यांसह नवनाथनगर, बेल्हेकरवाडी येथील युवकांनी बाजेवर असलेल्या बिबट्याजवळ चार दोर बांधून सोडलेल्या पिंजर्यात बिबट्या जाताच पिंजरा विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. येथून बिबट्या लोहगाव येथील नर्सरीत नेण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या कर्मचार्यांनी मोहीम यशस्वी केली. वन विभागास मोलाची साथ देणार्या युवकांचे कौतुक होत आहे.
हे ही वाचा :