जामखेड (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांसाठी 8 कोटी 70 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. याचा 19 हजार 560 शेतकर्यांना लाभ मिळेल. दरम्यान, 13 हजार रूपयांऐवजी 6 हजार 800 रूपयांवर बोळवण केल्याने सरकारने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा टीका होत आहे. तालुक्यात ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे 23 हजार 656 शेतकर्यांची पिके बाधित झाल्याचे पंचनाम्यानंतर समोर आले होते. त्यानुसार महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्यांनी पंचनामे केल्यानंतर तालुका प्रशासनाने 13 हजार 995 हेक्टरवरील पिकांचे नुकसान भरपाईपोटी 22 कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. परंतु सरकारकडून 27 मार्चच्या शासन निर्णयानुसार हेक्टरी 13 हजारांऐवजी 6 हजार 800 रुपये देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार 6 हजार 800 रुपये हेक्टरप्रमाणे 19 हजार 560 शेतकर्यांना 11 कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी प्रशासनाने सरकारकडे केली. त्यानुसार 8 कोटी 70 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यातील 2 कोटी 30 लाख रुपये सरकारकडे अजून येणे बाकी आहे. 4 हजार 116 शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. 13 हजार रूपयांऐवजी 6 हजार 800 रूपयांवर शेतकर्यांची बोळवण करण्यात आली आहे.
तालुक्याला 8 कोटी 70 लाख रूपये प्राप्त झाले असून, हे अनुदान संबधित शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी या शेतकर्यांचे आधार प्रमाणिकरण होणे आवश्यक आहे.
त्यानुसार तालुक्यातील 19 हजार 560 पैकी 15 हजार 444 शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू आहे. 2 कोटी 30 लाखांतील 34 गावे त्यातील 4 हजार 116 शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे 2 कोटी 30 लाखांचा हप्ता देखील लवकरच येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
शेतकर्यांच्या आधार प्रमाणीकरणचे काम सुरू असून, त्यातील काही शेतकर्यांचे आधारमधील नाव व बँकेतील नावात बदल किंवा एकच आधार क्रमांक विविध शेतकर्यांच्या खात्यावर दिला आहे. त्यामुळे असे 262 शेतकरी बाद झाले आहेत. तसेच, काही शेतकर्यांचे बँक खाते चुकीचे किंवा बँकेच्या आयएफ एससी कोड चुकीचा असेल, तर या शेतकर्यांचे खाते दुरुस्त करण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयात काम सुरू आहे. त्यामुळे चुकीची माहिती असलेल्या शेतकर्यांच्या आधार क्रमांकासह खाते दुरूस्तीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.
हेही वाचा :