अहमदनगर

अहमदनगरमधील 500 गावांवर पावसाची खप्पामर्जी; आजपासून पिकांची पाहणी

अमृता चौगुले

अहमदनगर : जिल्ह्यातील 42 महसूल मंडलांतील सुमारे 500 गावांमध्ये 21 दिवसांत पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे या गावांतील खरीप पिके वाया गेल्यात जमा आहे. या गावांतील शेतकर्‍यांना नुकसान भरपाईपोटी पीक विम्याची 25 टक्के रक्कम आगाऊ दिली जाणार आहे. त्यासाठी कृषी अधिकारी, विमा व शेतकरी प्रतिनिधींच्या संयुक्त समितीने या गावांतील पिकांची रँडम पध्दतीने पाहाणी करुन नुकसानीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश करण्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत.

दुष्काळ, अतिवृष्टी आदी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांपोटी भरपाई मिळावी, यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना सुरु आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी जवळपास 11 लाख 72 हजार शेतकर्‍यांनी पीकविमा उतरविला आहे. विमा उतरविलेल्या पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट येणार असल्यास, त्या पिकांच्या महसूल मंडळांत विमा नुकसानभरपाईची 25 टक्के रक्कम विमा कंपनीने आगाऊ देणे बंधनकारक आहे.

यंदा पावसाने दडी मारली आहे. गेल्या 21 दिवसांत 42 महसूल मंडलांत पावसाचा खंड पडला आहे. पावसाचा पडलेला खंड, उपग्रहाव्दारे टिपलेले पिकांचे छायाचित्र तसेच वर्तमानपत्रातील पिकांच्या नुकसानीचे बातम्या आदी मुद्याचा विचार कृषी विभागाच्या वतीने केला जात आहे. यासाठी कृषी अधिकारी, पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच शेतकर्‍यांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त समिती नियुक्त केली जाते. या समितीच्या वतीने पिकांच्या उत्पन्नात 50 टक्के घट झाली आहे का, याची रॅडम पध्तीने पाहाणी केली जात आहे. पावसाचा खंड पडल्याने 42 महसूल मंडलांतील खरीप पिकाची पाहाणी समितीने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सोमवारी दिले आहेत.

ही संयुक्त समिती मंगळवारपासून मंडलनिहाय दौरा करुन पिकांच्या नुकसानीची पाहाणी करणार आहेत. पिकांच्या उत्पन्नात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचा अहवाल समिती जिल्हाधिकारी सालीमठ यांना सादर करणार आहेत. अहवालानुसार सदर शेतकर्‍यांना पीकविम्याची 25 टक्के रक्कम आगाऊ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विमा कंपनीला देणार आहेत.

पावसाचा खंड पडलेले मंडळसंख्या

नगर 3, नेवासा 3,राहुरी 4, संगमनेर 9, कोपरगाव 4, पारनेर 5, श्रीगोंदा 7, कर्जत 3, शेवगाव 2, अकोले 1, जामखेड 1.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT