वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर-दौंड कॉर्डलाईन रेल्वेमार्गावर सारोळा कासार (ता.नगर) रेल्वेस्थानकादरम्यान मालगाडीच्या डब्यांचे लॉकर तोडून चोरट्यांनी साखरेची तब्बल 123 पोती लंपास केली. ही पोती रेल्वेमार्गालगतच्या शेतातील मक्याच्या पिकात लपवून ठेवल्याचे समोर आले. रेल्वे पोलिसांनी ती हस्तगत केली आहेत. नगर-दौंड रेल्वेमार्गावरील सारोळा कासार स्टेशनजवळ मालगाडीचे डबे फोडून त्यातील मालाच्या चोरीच्या घटना सातत्याने होत असतात.
त्यामुळे या परिसरात नेहमी रेल्वे पोलिस रात्रीच्या वेळी गस्त घालतात. दोन दिवसांपूर्वी मंगळवारी (दि.5) पहाटे मालगाडीचा एक डबा चोरट्यांनी फोडून त्यातील साखरेची पोती चोरून नेल्याचे निदर्शनास आले. गस्त घालणारे हवालदार बापू घोडके आणि सुनील मराठे यांनी दौंड लोहमार्ग पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे नगर व दौंड येथून लोहमार्ग पोलिसांची पथके व अधिकारी घटनास्थळी दाखल झाली.
या चोरीचा तपास करताना रेल्वेमार्गापासून 200 मीटर अंतरावर रेल्वे परिसराबाहेरील शेतात साखरेची पोती काळ्या ताडपत्रीमध्ये झाकून ठेवलेली आढळली. पोलिसांनी त्यांची मोजणी केली तेव्हा दोन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 123 साखरेची पोती आढळून आली. पोत्यांवर कृष्णा शुगर, चितळी, जिल्हा बेळगाव असा शिक्का आहे. ही पोती शेतात कोणी आणून ठेवली याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. 123 पोत्यांचे साधारणपणे 6150 किलो वजन असून, त्यांची किंमत एक लाख 90 हजार 650 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेली साखर पोती पोलिसांनी हस्तगत करून गुन्हा नोंद केला.
हेही वाचा