महाराष्ट्र

बीबीए, बीसीए अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त ‘सीईटी’ होणार

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि बीसीए या अभ्यासक्रमांसाठी यावर्षी प्रथमच सीईटी प्रवेश परीक्षा घेतली होती; परंतु बारावीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेची पुरेशी माहिती नसल्याने ही सीईटी देता आली नाही. दरम्यान, महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षने परिपत्रक जाहीर करत बीबीए, बीसीए अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त सीईटी होणार असल्याचे म्हटले आहे.

सीईटी पुन्हा होणार…

महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्‍या वतीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, "शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी बी.बी.ए, बी.सी.ए, बी.एम.एस व बी.बी.एम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता या कार्यालयामार्फत दिनांक २९ मे २०२४ रोजी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सामाईक प्रवेश परीक्षेमध्ये असंख्य उमेदवार सहभागी होऊ न शकल्यामुळे उमेदवार/पालक/संस्था यांनी या कार्यालयास व्यक्तीशाः भेट देऊन, विनंती अर्ज सादर करून, ई-मेल द्वारे त्याचप्रमाणे दूरध्वनीद्वारे अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत विनंती केली होती. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून शासनाने या कार्यालयास बी.बी.ए, बी.सी.ए, बी.एम.एस व बी.बी.एम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याची मान्यता दिलेली आहे. संबंधित परीक्षेबाबत या कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सुचना पाहण्यासाठी या कार्यालयाच्या संकेस्थळाला नियमितपणे भेट द्यावी. याची सर्व संबंधित विद्यार्थी/पालक/संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी."

प्रथमच बीबीए, बीसीए अभ्यासक्रमासाठी सीईटी झाली होती, पण…

बीबीए, बीसीए अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना देश-विदेशात नोकरी व उच्च शिक्षणाच्या संधी मिळतात. बीबीए, बीसीए हे व्यावसायिक अभ्यासक्रम यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) अखत्यारित होते. यावर्षी पहिल्यांदाच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एमबीए, एमसीए या व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या धर्तीवर बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम हे पदवी शिक्षणक्रमही अखत्यारीत घेतले आहेत. त्यामुळे त्यांना व्यावसायिक शिक्षणक्रमांचा दर्जा प्राप्त झाला आहे. एआयसीटीईच्या नियमानुसार यावर्षी पहिल्यांदाच बीबीए, बीसीएसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. परंतु अपेक्षित अर्ज न आल्यामुळे तीनवेळा मुदत वाढविली.

प्रवेश परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता यावर्षी सुमारे 60 टक्क्यांहून अधिक प्रवेश जागा रिकाम्या राहण्याची शक्यता आहे. दरवर्षी या अभ्यासक्रमाला सीईटीशिवाय प्रवेश होत होते. यावर्षी पहिल्यांदाच झालेल्या प्रवेश परीक्षेची विद्यार्थ्यांमध्ये पुरेशी जागृती न झाल्यामुळे अत्यल्प प्रतिसाद मिळाला. हजारो विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा पुन्हा एकदा घ्यावी. यावर्षासाठी प्रवेश परिक्षेशिवाय प्रवेश देण्याची परवानगी राज्य शासनाने द्यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालकांमधून होऊ लागली होती.

राज्यातील असलेल्या जागा

अभ्यासक्रम- महाविद्यालय- जागा

  • बीबीए- ३०५- ३२२१९
  • बीएमएम- २५- १९६४
  • बीसीए- ४९२- ५०१४१
  • बीएमएस-  २४८- २४४०९
  • एकूण – १०७१- १०८७४१

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT