Maharashtra Winter Session 
Latest

Maharashtra Winter Session :सीमावादाचे नागपुरातील विधिमंडळात पडसाद; …तर ॲक्शनला रिॲक्शन होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोनाली जाधव

नागपूर : पुढारी ऑनलाईन : सीमेवर सुरु असलेले आंदोलन आणि बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे आंदोलन दडपण्याच्या कर्नाटक पोलिसांच्या कृतीचे पदसाद आज नागपुरातील हिवाळी अधिवेशनात उमटले. सीमावादाचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन दिले. अॅक्शनला रिअॅक्शन होऊ शकते, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. (Maharashtra Winter Session)

दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई होते. यावेळी अमित शहांनी कर्नाटकला सूचना दिली आहे. सीमावादात राजकारण करता कामा नये. आज सीमावासीयांच्या मागे आम्ही सर्वांनी उभे राहायला पाहिजे. त्यांच्या लढ्यामागे उभे राहिले पाहिजे. सुप्रीम कोर्टातील प्रकरणावर परिणाम होता कामा नये, असे शिंदे यांनी म्हटले.

सीमाभागासह महाराष्ट्र आणि कर्नाटकचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव येथील मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली आहे. मेळाव्याचे स्थळ असलेल्या वॅक्सिन डेपो परिसरात 144 कलम लागू करून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलिसांनी दडपशाहीचा मार्ग अवलंबून कोणत्याही परिस्थितीत महामेळावा होऊ नये यासाठी चंग बांधला आहे. जमावबंदी झुगारून महामेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यास म. ए. समितीच्या नेत्यांना ताब्यात घेण्याची तयारीही पोलिसांनी चालवली आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील वातावरण तापले आहे. हा मुद्दा आज नागपुरातील महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करण्यात आला आहे.

Maharashtra Winter Session: मआविच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजी

दरम्यान, कर्नाटक सरकार हाय हाय.. बोम्मई सरकार हाय हाय… शिंदे सरकार हाय हाय… गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप… खोके सरकार, खोटे सरकार… ५० खोके एकदम ओके… खोके सरकार काय म्हणतंय, गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय… शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय…महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक…सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.

आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT