पुढारी ऑनलाईन डेस्क: "महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांना कर्नाटक सरकारने त्रास दिल्यानंतर आणि बोम्मई यांच्या आक्षेपार्ह वर्तनानंतर महाराष्ट्राच्या मातीची ती एकता दिसली नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. आपल्या माणसांना मारलं जातयं, आपली माणसं मार खात आहेत आणि तरीही आपण एकत्र येत नाही." असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. (Maharashtra – Karnataka)
गेले काही दिवस कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न समन्वयक चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि उच्चाधिकार समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांचा मंगळवारी (दि.६) बेळगाव दौरा रद्द करण्यात आला. मंगळवारी (दि.६) बेळगाव-हिरेबागेवाडी येथील टोल नाक्यावर 'कन्नड रक्षण वेदिका संघटने'च्या कार्यकर्त्यांनी काही वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे दोन्ही राज्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सर्वपक्षीय खासदारांवर निशाणा साधला आहे, त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, "महाराष्ट्राच्या मातीतून 48 खासदार लोकसभेत गेले आहेत. जेव्हा-जेव्हा महाराष्ट्राच्या मातीचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा-तेव्हा या 48 खासदारांनी पक्षभिनिवेश विसरुन एकत्र यावं ही सगळ्या मराठी जणांची इच्छा आहे. हे त्यांच्या मनात आहे."
जितेंद्र आव्हाडांनी आणखी एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये म्हंटलं आहे," महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांना कर्नाटक सरकारने त्रास दिल्यानंतर आणि बोम्मई यांच्या आक्षेपार्ह वर्तनानंतर महाराष्ट्राच्या मातीची ती एकी दिसली नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. आपल्या माणसांना मारलं जातयं, आपली माणसं मार खात आहेत आणि तरिही आपण एकत्र येत नाही."
हेही वाचा