Latest

महाराष्ट्रात नोकऱ्या मिळवण्यासाठी यूपीत मुलांना मराठी शिकवा, महाराष्ट्रातील भाजप नेत्याचे योगींना पत्र

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्रातील भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिले आहे. त्यांनी त्यात उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवावी, अशी विनंती केली आहे. शाळेतच मराठी भाषा शिकल्यास उत्तर प्रदेशातील मुलांना महाराष्ट्रात चांगल्या नोकऱ्या मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

"आपण गेली ५० वर्षे महाराष्ट्रात वास्तव्यास आहे. पण या काळात मला असे आढळून आले आहे की उत्तर प्रदेशातील मुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा दिल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रात येतात. पण त्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर भाषेची अडचण येते. त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसते. राज्य शासन तसेच महामंडळात नोकरीसाठी मराठी ज्ञान गरजेचे आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुलांना शिकण्यासाठी मराठी ही ऐच्छिक भाषा करावी. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात चांगल्या नोकऱ्या मिळतील." असे कृपाशंकर सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.

मुंबईत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील रहिवाशांच्या हितासाठी उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत कार्यालय उघडण्याचा निर्णय याआधी घेतला आहे. कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरितांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कार्यालय महाराष्ट्रात राहणार्‍या संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रात काम करणार्‍या उत्तर प्रदेशातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करेल आणि राज्यात गुंतवणूक आणण्याचे काम करेल, असे सांगण्यात आले आहे.

एका सरकारी प्रवक्त्याने याबाबत सांगितले होते की, कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान, जेव्हा महाराष्ट्र आणि इतर राज्यातील लाखो स्थलांतरित कामगार उत्तर प्रदेशात परतले, तेव्हा सरकारला असे वाटले की विविध राज्यांमध्ये उत्तर प्रदेशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक व्यक्ती असणे आवश्यक आहे. विशेषतः ज्या ठिकाणी उत्तर प्रदेशातील जास्तीत जास्त लोक आहेत. त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आणि संकटाच्या वेळी त्यांना मदत करण्याचा यामागे उद्देश आहे. मुंबईतील कार्यालय कोणत्याही संकटाच्या वेळी लोकांना उत्तर प्रदेशात परत आणण्यास मदत करेल आणि त्यांना त्यांच्या अनुभव आणि क्षमतेनुसार स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यास मदत करेल.

सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ५० ते ६० लाख उत्तर भारतीय लोक मुंबईत राहतात. यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत वास्तव्य आहे. कोरोना काळात देशाच्या इतर राज्यांत अडकून पडलेल्या उत्तर प्रदेशातील नागरिकांना सामाजिक-आर्थिक सुरक्षा देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. या घोषणेची पुर्तता म्हणून मुंबईत उत्तर प्रदेशातील नागरिकांसाठी कार्यालयात सुरु करण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT