पुढारी ऑनलाईन: बॉलीवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांच्या आई स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले. आज सकाळी ८.४० च्या सुमारास वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती माधुरी दीक्षितचे कौटुंबिक सहकारी रिक्कू राकेश नाथ यांनी दिली. स्नेहलता दीक्षित यांचा घरीच वृद्धापकाळाने नैसर्गिक मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. वरळीच्या स्मशानभूमीत रविवारी (दि.१२) दुपारी ३ च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने हिने जून 2022 मध्ये तिच्या आईच्या वाढदिवशी तिच्या इन्सटाग्रामवरून काही आठवणी शेअर केल्या आहेत. तिने सोशल मीडियावर एक संदेश लिहित आईला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने दुर्मिळ आणि न पाहिलेले फोटो शेअर केले होते.
तिने फोटोसोबत शेअर केलेल्या संदेशात म्हटले आहे की, वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई! ते म्हणतात की आई ही मुलीची बेस्ट फ्रेंड असते. यापेक्षा अधिक योग्य काही असू शकत नाहीत. तू माझ्यासाठी केलेली प्रत्येक गोष्टी आणि तू शिकवलेले धडे तुझ्याकडून माझ्यासाठी हीच सर्वात मोठी भेट आहे. मी तुला फक्त चांगले आरोग्य आणि आनंदाची शुभेच्छा देऊ शकते! असे म्हटले आहे.