नाशिक : गौरव जोशी
‘ने मजसी ने परत मातृभूमीला; सागरा प्राण तळमळला’ या गीतामधून मनामनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटविणार्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाची स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही शासनदरबारी उपेक्षा कायम आहे. स्वातंत्र्यवीरांच्या भगूर येथील जन्मस्थळ स्मारकाची डागडुजी सध्या सुरू आहे. पण, स्मारकाला राष्ट्रीय वारसास्थळाच्या दर्जासाठी आजही लढा द्यावा लागत असल्याचे शल्य सावरकरप्रेमींमध्ये आहे.
स्वातंत्र्य संग्रामात प्राणाची बाजी लावून लढणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भगूर ही जन्मभूमी. एकाच जीवनात दोनदा जन्मठेपेची शिक्षा भोगणारे सावरकर यांनी भगूरमधूनच भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्याची शपथ घेतली. त्यामुळे देशभरातील सावरकरप्रेमींसाठी हे स्थान आजही ऊर्जा देते. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीने दहा वर्षांसाठी हे स्मारक दत्तक घेतले आहे. रोज साधारणत: 150 ते 200 नागरिक स्मारकाला भेट देतात.
भगूरजवळून वाहणार्या दारणा नदीकाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने बगिचा उभारण्यात येत आहे. मात्र, गेल्या 20 वर्षांपासून हे काम सुरू आहे. राज्य पुरातत्त्व विभागाकडून दोन महिन्यांपासून स्मारकाच्या डागडुजीचे काम सुरू आहे.
भगूर-देवळाली कॅम्प या चार किलोमीटरच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. भगूर शहराला जोडणार्या चारही दिशांच्या रस्त्यांवर स्मारकाकडे जाणार्या फलकांची प्रतीक्षाच आहे. परिणामी, स्मारकाला भेट देण्यार्यांना विचारपूस करत स्मारकापर्यंत पोहोचावे लागते. एकूणच स्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी पार करावी लागणारी अडथळ्यांची शर्यत बघता सावरकरप्रेमींच्या मुखातून आपसूक ‘सागरा प्राण तळमळला’ हे उद्गार बाहेर पडतात.