

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सामाजिक कार्यकर्त्या, लेखक आणि राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात हा पुरस्कार सोहळा गुरुवारी (दि.1)) पार पडला. यावेळी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे दीपक टिळक यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रसचे खासदार श्रींमत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. विशेष म्हणजे सुधा मूर्ती यांचे पती इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना २० वर्षांपूर्वी २००४ मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पुरस्काराला उत्तर देताना सुधा मूर्तींनी आनंद व्यक्त करत टिळक परिवाराचे आभार व्यक्त केले. आपल्या माणसांकडून होणारा सन्मान खूप मोठा असतो, हा माझ्या माहेरचा सन्मान आहे, असे यावेळी त्या म्हणाल्या. बाल वयातच लोकमान्य टिळक यांच्या कार्याची प्रेरणा मिळाली, महाराष्ट्राला मोठ्या परंपरेचा वारसा आहे. तो पैसे देवून मिळत नाही, आपण तो जपला पाहिजे, असेही मूर्ती यावेळी म्हणाल्या. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांना प्रत्यक्ष बघु शकले नाही मात्र त्यांचे वारसदार शाहू महाराज इथे आहेत, असे म्हणत सुधा मूर्ती यांनी खासदार शाहू महाराज यांना भाषण थांबवून नमस्कार केला. महाराष्ट्रातील मराठी जनतेने मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, सुधा मूर्ती यांनी पुरस्कारात मिळालेली १ लाख रूपये रक्कम 'मेक यू लाईफ' या स्वयंसेवी संस्थेला मदत म्हणून दिली.
शरद पवार यांनी टिळक पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच दिल्लीत होत असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित खासदारांचा उल्लेख त्यांनी केला. सुधा मूर्तींचे सामाजिक कार्य खूप महत्वाचे आणि उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले.
तत्पूर्वी, खासदार शाहू महाराज यांनी लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकला. कोल्हापुरचे छत्रपती घराणे आणि टिळक घराण्याचे सबंध १५० वर्षांपासून आहेत. दोघांचे विचार काही प्रमाणात वेगळे असले तरीही सुधारणावादी होते. कोल्हापूरने डेक्कन एज्युकेशन सोसायटीसाठी मोठी मदत केली होती, असेही शाहू महाराज म्हणाले. भारताला पुढे नेण्यात सुधा मूर्ती यांचे योगदान महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२३ मध्ये टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. त्यापुर्वी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, मनमोहन सिंह, अटल बिहारी वाजपेयी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. शरद पवार यांना २०१६ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराची सुरुवात १९८३ पासून झाली, पहिल्यांदा एस. एम. जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला. सुधा मूर्ती यांच्यासह आतापर्यंत ४२ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.