Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : यूपीच्या अमरोहामध्ये काँग्रेस गेली ४० वर्षे विजयापासून वंचित

मोहन कारंडे

विशेष प्रतिनिधी

कधीकाळी गांधी घराण्याला विजयाची हमखास गॅरंटी देणार्‍या अमेठी, रायबरेलीसह उत्तर प्रदेशातील अनेक मतदार संघांमध्ये काँग्रेसची स्थिती फारच वाईट आहे. काँग्रेसला आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जंगजंग पछाडावे लागत आहे. विजयासाठी काँग्रेसने समाजवादी पक्षासोबत आघाडी करून शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. अमरोहा या मतदार संघात तर काँग्रेसने गेली 40 वर्षे विजयाचा गुलाल उधळला नसल्याचे दिसून आले आहे.

अमरोहामध्ये 1984 साली काँग्रेसचे रामपाल सिंह यांनी विजय मिळविला होता. तेव्हापासून आतापर्यंत प्रयत्न करूनही काँग्रेसला यश मिळाले नाही. गेल्या 40 वर्षांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तीनदा, बहुजन समाज पक्षाने दोनदा, तर समाजवादी पक्ष, जनता दल आणि राष्ट्रीय लोक दलाने प्रत्येकी एक वेळा या मतदार संघात विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. 2004 च्या निवडणुकीत अपक्ष हरीश नागपाल यांनी विजय मिळविला होता.

यंदाच्या निवडणुकीत बसपा सोडून काँग्रेसमध्ये आलेले कुंवर दानिश अली यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये अली यांनी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळविला होता. त्यांनी भाजपचे उमेदवार कंवरसिंह तंवर यांचा 63 हजार 248 मतांनी पराभव केला होता. कंवरसिंह तंवर यांना पराभवानंतरही भाजपने संधी दिली आहे.

दुसर्‍या टप्प्यात 26 एप्रिल रोजी होणार्‍या मतदानासाठी काँग्रेस अमरोहासह बुलंदशहर, मथुरा आणि गाझियाबाद मतदार संघात निवडणूक लढवत आहे. सपासोबत आघाडी असल्याने कुंवर दानिश अली यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव प्रचाराला भिडले आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT