Latest

Lok Sabha Election 2024 : गांधी कुटुंबियांना आता राज्यसभेचा प्रस्ताव

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : गांधी कुटुंबियांचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या रायबरेलीमधून सोनिया गांधींऐवजी प्रियांका गाधी निवडणूक लढणार असल्याची कुजबूज कॉंग्रेसच्या वर्तुळात सुरू आहे. असे असताना आता कॉंग्रेसशासीत हिमाचल प्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांनी गांधी कुटुंबियांसमोर राज्यसभा व लोकसभेचा प्रस्ताव पुढे केला आहे. (Lok Sabha Election 2024)

सोनिया गांधी किंवा प्रियांका गांधींनी हिमाचल प्रदेशातून राज्यसभा निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू यांच्याकडून देण्यात आला आहे. पाठोपाठ, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी सोनिया गांधींना तेलंगणातून राज्यसभा निवडणूक तर प्रियांका गांधींना लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. अद्याप केंद्रीय नेतृत्वाने दोन्हीही राज्यांच्या प्रस्तावावर भाष्य केलेले नाही. मात्र, गांधी कुटुंब पारंपरिक मतदार संघ सोडणार काय, अशी नवी चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केवळ थोडा अवधी शिल्लक आहे. काँग्रेसने २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना केला. २०१९ च्या लोकसभेत तर दस्तुरखुद्द राहुल गांधींना अमेठीतुन पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. प्रियंका गांधी या लोकसभा निवडणुकीत महत्वाही भूमिका बजावतील, हे कॉंग्रेस संघटनेत झालेल्या फेरबदलानंतर पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

प्रियंका गांधी काँग्रेसचा आक्रमक चेहरा आहेत, असे कॉंग्रेस पक्षाला वाटते. त्यामुळे त्या संसदेत आल्यास पक्षाला ऊर्जा मिळेल असाही समज काँग्रेस पक्षात आहे. त्यावरून प्रियंका गांधींच्या खासदारकीबद्दल चर्चा सुरू आहेत. सोनिया गांधी यांनी तेलंगणामधून लोकसभा लढवावी तर प्रियंका गांधी यांनी रायबरेलीतुन लोकसभा लढवावी, असा प्रस्ताव तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार सोनिया गांधी आणि राहुल गांधींना देखील दिल्याचा प्रस्तावही तेलंगणा काँग्रेसने केंद्रीय नेतृत्वाला पाठवला आहे.

हिमाचल प्रदेशातून सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधी राज्यसभेवर जाव्यात यासाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू आग्रही आहेत. यासंदर्भात मंगळवारी सुचक विधान हिमाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी केले आहे. प्रियंका गांधी यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे आल्यास त्यांना विरोध होण्याचा किंवा त्या निमित्ताने गटबाजी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अन्य नेत्यांना राज्यसभेत पाठवायचे झाल्यास मतमतांतरे होऊ शकतात.

दरम्यान, रायबरेली हा कॉंग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. सोनिया गांधी या मतदारसंघातुन ५ वेळा लोकसभावर निवडुन गेल्या आहेत. मात्र अलीकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या लोकसभा लढवतील की नाही याबाबत स्पष्टता नाही. जर सोनिया गांधी राज्यसभावर गेल्या तर त्यांच्या ठिकाणी प्रियंका गांधी रायबरेलीच्या उमेदवार असु शकतात. मात्र प्रियंका गांधी लोकसभा निवडणुकीचा देशभर प्रचार करत असताना लोकसभा लढवणार का, यावरही कॉंग्रेसने अद्याप कुठलेही भाष्य केले नाही.

तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमधून चर्चा का?

तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. या दोन्ही राज्यांमध्ये प्रियंका गांधींनी जोरदार प्रचार केला होता. हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यातही प्रियंका गांधींचा मोठा वाटा होता. काही दिवसांपूर्वीच प्रियंका गांधींनी हिमाचल प्रदेशात घर देखील घेतले आहे. त्यामुळे सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नावाची चर्चा तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमधून होत आहे. मात्र उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या पारंपारिक मतदारसंघांबद्दल काँग्रेसने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT