पुढारी ऑनलाईन डेस्क : लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे निव्वळ टाइमपास असून त्यात कोणतीही स्थिरता नसते, असे प्रखड मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. या नातेसंबंधात प्रामाणिकपणाचा अभाव असतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असलेल्या आंतरधर्मीय जोडप्याने पोलिस संरक्षणाच्या मागणीसाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. Live-in relationships are time pass
न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी आणि मोहंमद अझहर हुसैन यांच्या पीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू होती. "सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिप ग्राह्य धरणारे काही निकाल दिले आहेत. पण या प्रकरणातील जोडप्यांचे वय २० ते २२ आहे आणि ते दोन तीन महिन्यांपासून नातेसंबंधात आहेत. या कोवळ्या वयातील नाते म्हणजे विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल वाटणारे आकर्षण असते. आयुष्य काही फुलांची चादर नसते. प्रत्येक जोडप्याला कठीण स्थितीतून जावे लागते. 'लिव्ह इन' हा एक प्रकारे टाइमपास आणि तात्पुरते असते. त्यामुळे तपास सुरू असेपर्यंत आम्ही कोणतेही संरक्षण देण्याचे टाळत आहोत." Live-in relationships are time pass
या प्रकरणातील तरुण मुस्लिम आहे, तर तरुणी हिंदू आहे. या तरुणावर अपहरणाचा गुन्हा नोंद झालेला आहे. याविरोधात या जोडप्याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहोत, आणि आम्हाला संरक्षण मिळावे, अशी याचिका या जोडप्याने न्यायालयात दाखल केली होती. या तरुणीच्या वकिलांनी ती सज्ञान असल्याने कोणासोबत राहयाचे याचा निर्णय ती घेऊ शकते, असा दावा केला होता. प्रतिवादी पक्षाने या खटल्यातील तरुणावर गुन्हे नोंद असल्याचे निदर्शनास आणून दिले.
न्यायमूर्तींनी हेही स्पष्ट केले की हा निकाल म्हणजे न्यायालयाने कोणतीही बाजू घेतली आहे, असा अर्थ काढला जाऊ नये.
"अशा नातेसंबंधात स्थैर्य आणि प्रामाणिकपणाचा अभाव असतो. हे एक प्रकारचे आकर्षण असते. जेव्हा जोडपे लग्न करायचा निर्णय घेते, नात्याला नाव देते तेव्हा ते एकमेकांशी प्रामाणिक असतात. अशा प्रकारच्या नात्यांबद्दल कोणतेही मत व्यक्त करण्याचे न्यायालय टाळत आहे," असेही या निकालपत्रात म्हटले आहे.
हेही वाचा