Live in Relationship : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधला वाद गाठतोय क्रूरतेचा कळस: ठाणे परिसरात सहा महिन्यांत ४१ महिलांचा खून | पुढारी

Live in Relationship : 'लिव्ह इन रिलेशनशिप'मधला वाद गाठतोय क्रूरतेचा कळस: ठाणे परिसरात सहा महिन्यांत ४१ महिलांचा खून

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्य, अनैतिक संबंध, लालच, नशा अशा कारणांतून हत्या यासारखे गंभीर गुन्हे घडतात. मात्र, गेल्या काही वर्षांत लिव्ह इन रिलेशनशिपमधला विकोपाला जाणारा वाद देखील जीवघेणा ठरतो आहे. ठाणे शहर आयुक्तालयात मागील सहा महिन्यांत एकूण ४१ खुनांचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी ३५ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एकूण खुनांच्या गुन्ह्यापैकी आठ गुन्ह्यात लिव्ह इन रिलेशनशिप मधला वाद विकोपाला गेल्याने साथीदारानेच साथीदारास संपवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या काही जोडप्यांचा विकोपाला जाणारा वाद जीवावर उठत असल्याचे समोर येत आहे. (Live in Relationship)

Live in Relationship : देशभरात ३८ टक्क्यांनी वाढ

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार मागील दोन वर्षांत देशभरात महिलांच्या घरगुती व जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या हिंसाचारात बळी पडणाऱ्या महिलांमध्ये ११ टक्के संख्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणींची आहे. देशभरात दाखल होणाऱ्या महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्येही लिव्ह इनमुळे मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप च्या नावाखाली फसवणूक करून लैंगिक शोषण करणे, मारहाण करणे, आर्थिक शोषण करणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांत देखील मोठी वाढ झाली असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी मोठी बोलकी आहे.

दिल्ली येथील श्रद्धा वाळकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. त्यानंतर काहीच महिन्यांत मीरा रोड येथे राहणाऱ्या ५६ वर्षीय मनोज साने याने त्याच्या सोबत तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय प्रेयसीची निघृण हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केल्याची आणि मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. मुंबई शहराचे उपनगर म्हणून ओळखले जाणाऱ्या मीरा भाईंदर भागात ही घटना घडल्याने मुंबईसह सारा महाराष्ट्र या क्रूरतेच्या घटनेने शहारून गेला होता.

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीची हत्या

अशीच घटना काही महिन्यांपूर्वी भिवंडीत घडली होती. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीची तिच्याच साथीदाराने गळा दाबून हत्या केल्यानंतर रुग्णवाहिकेमधून तरुणीचा मृतदेह गुपचूप गावी नेण्याचा आरोपीने प्रयत्न होता. मात्र, भिवंडी पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीला पुण्यातून ताब्यात घेत अटक केली होती. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर हा वाद एके दिवशी इतका विकोपाला गेला की, या वादानंतर तरुणीची हत्या तिच्याच साथीदाराने केली. अशाच प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाच्या महिला-पुरुषांचा वाद जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांबरोबरच हत्येचा प्रयत्न, जबर मारहाण, फसवणूक आदी देखील प्रकार लिव्ह इनच्या प्रकारातून समोर येत आहेत. अशा रिलेशनमध्ये राहण्यासाठी मानसिक तयारी अनेक जोडप्यांमध्ये नसते. अनेकदा आपल्या पार्टनरच्या काही सवयी एकमेकांना आवडत नाहीत आणि छोट्यामोठ्या गोष्टीतून वाद होतात. काही वेळा हे वाद इतके विकोपाला जातात की त्यातून गंभीर गुन्हे देखील घडतात असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अनेक वेळा लिव्ह इन रिलेशनशिप नात्याच्या बंधनातून बाहेर पडण्याची धडपड जोडपे करतात आणि जोडीदारापासून पिच्छा सोडवण्यासाठी देखील हत्येसारखे गंभीर गुन्हे घडतात, असे गुन्हे शाखेच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा 

Back to top button