warren buffett  Pudhari
lifestyle

Warren Buffett: ४८ वर्षांपासून पाणीच प्यायले नाहीत; मग जगतात कसे? वॉरेन बफे यांची ही सवय ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Warren Buffett Cherry Coke: जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी गेल्या ४८ वर्षांत पाणी प्यायले नाही असा दावा अॅकमन यांनी केला आहे.

Rahul Shelke

Warren Buffett Cherry Coke: जगातील दिग्गज गुंतवणूकदार आणि अब्जाधीश वॉरेन बफे यांची संपत्ती, गुंतवणुकीची पद्धत आणि साधी राहणी यांची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, यावेळी ते त्यांच्या एका वेगळ्याच सवयीमुळे चर्चेत आले आहेत. गेल्या ४८ वर्षांत आपण पाण्याचा एक ग्लासही प्यायलेलो नाही, असा दावा बफे यांनी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, साध्या किंवा स्पार्कलिंग पाण्याऐवजी त्यांना चेरी कोक हे शीतपेय अधिक आवडते.

ही माहिती पर्शिंग स्क्वेअर कॅपिटल मॅनेजमेंटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बिल अॅकमन यांनी दिली आहे. 'इक्विटी मेट्स इन्व्हेस्टिंग' या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी बफे यांच्यासोबतच्या एका जुन्या भेटीचा किस्सा सांगितला.

काही वर्षांपूर्वी अॅकमन यांनी वॉरेन बफे यांना जेवणासाठी घरी बोलावले होते. बफे यांना कोका-कोला विशेष आवडते, हे अॅकमन यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी पाहुण्यांसाठी आधीच भरपूर चेरी कोक आणून ठेवले होते.

जेवणाच्या वेळी अॅकमन यांनी बफे यांना साधे पाणी प्यायचे की स्पार्कलिंग वॉटर, असे विचारले. मात्र, बफे यांनी दोन्ही पर्याय नाकारले. त्यानंतर अॅकमन यांनी त्यांना एक वेगळाच प्रश्न विचारला. तुम्ही पाणी अजिबात पीत नाही का?

यावर बफे यांनी दिलेले उत्तर ऐकून अॅकमन यांनाही आश्चर्य वाटले. 'बिल, मी गेल्या ४८ वर्षांत पाणी प्यायलेलो नाही,' असे बफे म्हणाल्याचे अॅकमन यांनी सांगितले.

दिवसातून पाच वेळा कोका-कोला पिण्याची सवय

वॉरेन बफे यांचे कोका-कोलावरील प्रेम काही नवीन नाही. त्यांच्या या सवयीची अनेकदा चर्चा झाली आहे. २०१५ मध्ये 'फॉर्च्यून'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दररोज किमान पाच वेळा १२ औंस म्हणजेच सुमारे ३५५ मिली कोका-कोलाचे सेवन करत असल्याचे सांगितले होते.

विशेष म्हणजे, दिवसभरात आपण २,७०० कॅलरी घेत असू, तर त्यातील जवळपास एक चतुर्थांश कॅलरी कोका-कोलामधून मिळतात, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली होती.

चेरी कोकबद्दलचे त्यांचे प्रेमही अनेक दशकांपासून कायम आहे. १९८५ च्या भागधारकांना लिहिलेल्या पत्रात बफे यांनी आपल्या शीतपेयाच्या आवडीत बदल केल्याचे जाहीर केले होते. इतकेच नाही, तर बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक सभेचे अधिकृत पेय म्हणूनही त्यांनी चेरी कोकची घोषणा केली होती.

कोका-कोलामध्ये बफे यांची मोठी गुंतवणूक

कोका-कोलाशी बफे यांचे नाते केवळ आवडीपुरते मर्यादित नाही. त्यांच्या कंपनीने म्हणजेच बर्कशायर हॅथवेने १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९९० च्या दशकात कोका-कोलामध्ये मोठी गुंतवणूक केली होती.

या गुंतवणुकीतून कंपनीने कोका-कोलाचे जवळपास ९ टक्के शेअर्स खरेदी केले. त्यासाठी सुमारे १.३ अब्ज डॉलर खर्च करण्यात आले होते. 'बिझनेस इनसाइडर'च्या वृत्तानुसार, डिसेंबरअखेर या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे २८ अब्ज डॉलर होते. म्हणजेच, बफे यांच्यासाठी कोका-कोला हे केवळ आवडते पेय नाही, तर त्यांच्या यशस्वी गुंतवणुकीचाही एक महत्त्वाचा भाग आहे.

मॅकडोनाल्डच्या नाश्त्यापासून चेरी कोकपर्यंत

वॉरेन बफे यांना फास्ट फूडचीही विशेष आवड आहे. मॅकडोनाल्डचा नाश्ता, बर्गर, फ्रेंच फ्राइज, हॉट डॉग, पॉपकॉर्न, कुकीज आणि आईस्क्रीम हे त्यांचे आवडते पदार्थ आहेत.

१९९५ मध्ये बफे यांनी बिल गेट्स आणि त्यांची तत्कालीन पत्नी मेलिंडा यांच्यासोबत चीनचा १७ दिवसांचा दौरा केला होता. या दौऱ्यातही त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा अनुभव इतरांना आला.

अॅलिस श्रोडर यांच्या 'द स्नोबॉल : वॉरेन बफे अँड द बिझनेस ऑफ लाइफ' या चरित्र पुस्तकात या दौऱ्याचा उल्लेख आहे. चीन दौऱ्यादरम्यान बफे यांना जेवणात बर्गर आणि फ्रेंच फ्राइज मिळावेत, यासाठी गेट्स दाम्पत्याने हॉटेलमधील आचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या होत्या.

इतकेच नाही, तर चीनच्या प्रसिद्ध ग्रेट वॉलला भेट देतानाही बफे यांच्या आवडीची काळजी घेण्यात आली होती. इतरांसाठी शॅम्पेनची व्यवस्था करण्यात आली होती, तर बफे यांच्यासाठी खास चेरी कोक ठेवण्यात आले होते.

जगभरातील लोकांसाठी पाणी हे जीवनावश्यक पेय मानले जाते, तर दुसरीकडे जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या वॉरेन बफे यांच्या चेरी कोकच्या आवडीचा हा किस्सा चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT