Relationship Tips :
दिल्ली : लग्न ठरल्यानंतर मुला-मुलींमध्ये बोलण्याचा ओघ सुरू होतो. ते एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. याच संवादातून नातं मजबूत होतं. मात्र, काही वेळा मुलांकडून होत असलेल्या काही चुका या नव्या नात्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.
आपल्या होणाऱ्या पत्नीशी फोनवर बोलण्याच्या उत्साहात, ते अनेकदा अशा काही चुका करून बसतात, ज्यामुळे त्यांचे नाते बिघडू शकते किंवा लग्नाआधीच मुलीसमोर त्यांचे इम्प्रेशन खराब होऊ शकते. जर तुमचंही लग्न ठरलं असेल आणि त्यात अजून काही महिने वेळ असेल, तर या काळाचा योग्य वापर करा. नातं घट्ट आणि आनंदी बनवायचं असेल, तर या गोष्टी लक्षात ठेवा.
लग्नापूर्वी अनेक मुले लहान-सहान गोष्टींवरून संशय घेऊ लागतात. जसे की, कोणाशी बोलत होतीस?, उत्तर द्यायला इतका उशीर का केलास?, फोन उचलायला एवढा वेळ का लागला?, बाहेर कुठे जात आहेस? अशा वागण्यामुळे नात्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. मुलांनी आपल्या होणाऱ्या जीवनसाथीवर विश्वास ठेवायला हवा. जास्त प्रश्न-उत्तरे करण्याऐवजी नात्यात विश्वास महत्त्वाचा आहे. तुम्ही त्यांचे सर्वात मोठे समर्थक आहात, तुरुंगाप्रमाणे बंधन नाही, याची त्यांना जाणीव करून द्या.
लग्नापूर्वी आपल्या भावी जोडीदाराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. संवाद साधण्याचा उद्देशच एकमेकांना समजून घेणे हा असतो, पण लग्नापूर्वी जोडीदाराला नात्यात स्पेस देणे खूप महत्त्वाचे आहे. वारंवार खासगी प्रश्न विचारल्याने नाते कंटाळवाणे होऊ शकते. विशेषतः खूप जास्त खासगी प्रश्नांमुळे त्यांना अवघडल्यासारखे वाटू शकते. नात्याला हळूहळू आणि वेळेनुसार पुढे जाऊ देणे तुमच्यासाठी योग्य राहील.
प्रत्येक वेळी तुमच्या होणाऱ्या पत्नीनेच कॉल किंवा मेसेज करावा, अशी तुमची अपेक्षा असेल, तर हा विचार बदलायला हवा. नाते हे एकमेकांना समजून घेतल्याने पुढे जात असते. नेहमी तिनेच तुम्हाला कॉल किंवा मेसेज करावा, असा विचार करण्याऐवजी तुम्ही पुढाकार घ्या. यावरून दिसून येते की, तुम्हीसुद्धा या नात्यासाठी तितकेच उत्सुक आहात.
लग्न ठरण्यापूर्वी जर तुमचे कोणावर प्रेम असेल किंवा तुम्ही कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असाल, तर त्याबद्दल तुमच्या होणाऱ्या पत्नीशी जास्त बोलू नका. अनेकदा मुले नकळतपणे आपल्या एक्स-गर्लफ्रेंडबद्दल बोलून जातात, ज्यामुळे होणाऱ्या पत्नीला अवघडल्यासारखे वाटू शकते. भूतकाळातील गोष्टी आणि नाती तिथेच सोडून द्या. नवीन नात्यात नवीन दृष्टिकोन ठेवा आणि तुमच्या दोघांच्या वर्तमान आणि भविष्याबद्दल बोला.
अनेकदा लोक फोनवर बोलता-बोलता इतर कामांमध्ये व्यस्त असतात. विशेषतः जर तुम्ही गेम खेळत असाल किंवा सोशल मीडिया वापरत असाल, तर ते त्वरित बंद करा. जर तुम्ही कॉलवर असूनही गेम खेळत असाल किंवा सोशल मीडिया स्क्रोल करत असाल, तर तुमच्या बोलण्याला काहीही महत्त्व दिले जात नाही, असे तुमच्या होणाऱ्या पत्नीला वाटू शकते. पूर्ण लक्ष देऊन संवाद साधा. यामुळे भावनिक जवळीक निर्माण होते. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामात व्यस्त असाल, तर त्यांच्याकडे वेळ मागून घ्या. पण जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलाल, तेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या जोडीदारावरच असले पाहिजे.