money plant to rubber plant these 6 plants can attract mosquito to your house
पुढारी ऑनलाईन :
घर सुंदर दिसावे आणि ताजी हवा मिळावी म्हणून आपण अनेक प्रकारची झाडे लावतो. पण तुम्हाला माहिती आहे का की काही झाडे नकळत घरात डासांना आकर्षित करू शकतात? काही झाडांची रचना, त्यांची ओलावा ठेवण्याची क्षमता आणि दाट पाने डासांसाठी जणू स्वर्गासारखी जागा बनतात. म्हणूनच डासांपासून बचाव करण्यासाठी अशा झाडांची माहिती असणे आवश्यक आहे.
घरात हिरवळ आणि ताजी हवा मिळावी म्हणून झाडे लावणे सर्वांनाच आवडते. पण कधी कधी सौंदर्याच्या नादात आपण अशी झाडे निवडतो जी डास लपण्यासाठी आणि अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा बनू शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये मनी प्लांटचाही समावेश आहे.
जे झाडे जास्त ओलावा धरून ठेवतात किंवा ज्यामध्ये पाणी साचून राहते, ती डेंग्यू आणि मलेरिया पसरवणाऱ्या डासांना आकर्षित करतात. त्यामुळे अशा झाडांची योग्य काळजी घेणे आणि काही खबरदारी पाळणे खूप महत्त्वाचे आहे.
बांम्बू प्लांट
लकी बांम्बू अनेक लोक घरात काचेच्या भांड्यात पाण्यात ठेवतात कारण ते सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पण या भांड्यातील साचलेले पाणी डासांसाठी मोठे कारण ठरते. जर बांम्बूचे पाणी आठवड्यातून दोनदा बदलले नाही तर त्यात डेंग्यू आणि मलेरियाचे डास अंडी घालू शकतात. त्याच्या दाट मुळांमध्ये डास लपून वाढू शकतात.
मनी प्लांट
मनी प्लांट जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात आढळतो. तो अनेकदा पाण्याच्या बाटलीत सजावटीसाठी ठेवला जातो, ज्यामुळे डास आकर्षित होऊ शकतात. मनी प्लांटची वेल खूप दाट असते आणि तो कमी प्रकाशातही वाढतो. अंधार आणि ओलसर जागा डासांना खूप आवडतात. बाटलीतील पाणी आणि वेलीमागील ओलावा डासांना लपण्यासाठी सुरक्षित जागा देतात.
रबर प्लांट
रबर प्लांट त्याच्या मोठ्या आणि रुंद पानांसाठी ओळखला जातो. इंडोर प्लांट म्हणून तो खूप लोकप्रिय आहे. पण त्याच्या पानांवर धूळ आणि ओलावा सहज साचतो. जर पानांवर पाणी फवारले आणि ते पानांच्या सांध्यात साचले तर डास वाढू शकतात. त्याची दाट सावलीही डासांना आवडते.
बोनसाई आणि दाट सजावटीची झाडे
बोनसाई किंवा कोणतेही झाड ज्याची रचना खूप दाट आणि झुडपासारखी असते, ते डासांसाठी नैसर्गिक निवारा बनू शकते. अशा झाडांच्या खालच्या भागापर्यंत सूर्यप्रकाश आणि हवा पोहोचत नाही, त्यामुळे तिथे नेहमी ओलावा राहतो. कुंडीत पाणी साचल्यास डासांची अळी वाढण्याची शक्यता असते.
पाण्यात वाढणारी झाडे
जर तुम्ही बाल्कनी किंवा बागेत सजावटीसाठी छोट्या टबमध्ये वॉटर लिली किंवा कमळ लावले असेल तर तेही डासांना आकर्षित करू शकतात. कारण साचलेले पाणी डासांच्या प्रजननासाठी योग्य असते. योग्य स्वच्छता आणि पाण्याची काळजी न घेतल्यास अशा झाडांमुळे डासांची संख्या वाढू शकते.
फर्न
फर्नची झाडे त्यांच्या मऊ आणि दाट पानांसाठी निवडली जातात. त्यांना जिवंत राहण्यासाठी जास्त ओलावा आणि सावली लागते. त्यावर वारंवार पाणी फवारावे लागते, त्यामुळे त्याच्या आसपासचे वातावरण नेहमी ओलसर राहते. त्याची पाने खूप दाट असल्यामुळे डास त्यामध्ये सहज लपून बसू शकतात.
यातील माहिती इंटरनेटवरून संकलित केली आहे. ती वाचकांपर्यंत पोहोचविणे इतकाच हेतू आहे. त्याची वाचकांनी शहानिशा करावी. याची जबाबदारी आम्ही घेत नाही.