नवी दिल्ली : Lifestyle : दुपारी जेवल्यानंतर अनेकांना हटकून झोप येते. विशेषतः उन्हाळ्यात तर असे नेहमीच घडत असते. जेवल्यानंतर दहा ते वीस मिनिटांनी डोळ्यांवर झापड येऊ लागते. त्याची अनेक कारणे असतात तसेच अशी झोप घेणे काही अंशी लाभदायकही ठरते. मात्र, ती किती वेळ घ्यावी हे जाणून घ्यावे लागेल.
Lifestyle : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दुपारच्या झोपेमागे अनेक कारणे असतात. ज्यावेळी आपण जेवतो त्यावेळी अन्न पोटात जाते व रक्तसंचारही पचनासाठी त्या दिशेने अधिक होतो. त्यामुळेही झोप येऊ शकते. लंचटाईमपर्यंत अनेक तास काम झालेले असू शकते. त्यामुळे थकवा येऊन जेवल्यानंतर थोडा आराम करण्याची भावना होऊ शकते. रात्री झोप नीट झालेली नसेल तर दुपारी जेवल्यानंतर झोप येऊ शकते. 60 टक्के लोकांना रात्री चांगली झोप न झाल्याने दुपारी झोप येत असते.
Lifestyle : दुपारच्या जेवणात मसालेदार, तेलकट पदार्थ अधिक खाल्ल्यानेही सुस्ती येते. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळेही शारीरिक हालचालींमध्ये थकवा येतो. असे लोक सामान्य काळापेक्षा अधिक काळ झोपतात. जेवल्यानंतर कधी कधी सेरोटोनिन हार्मोन अधिक वेगाने बनू लागते व त्यामुळेही झोप येते. शरीरात पाण्याची कमतरता असेल त्यावेळीही थकवा येऊन झोप येते. कधी कधी काही औषधांचाही प्रभाव असतो. तज्ज्ञांच्या मते, एका निरोगी माणसाला दुपारी पंधरा ते वीस मिनिटांची झोप किंवा एक डुलकी घेणे चांगले ठरते. त्यापेक्षा अधिक झोप घेतल्याने फायद्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकते.