नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : LIC IPO बद्दल एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. देशातील या सर्वात मोठ्या IPO ला रशिया-युक्रेन युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. सरकारी मालकीची विमा कंपनी एलआयसीच्या आयपीओसाठी गुंतवणूकदार बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. पण हा IPO पुढील आर्थिक वर्षासाठी पुढे ढकलला जाऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार एक बैठक घेण्याच्या तयारीत असून यात रशिया-युक्रेनमधील वाढत्या युद्धामुळे IPO च्या लाँचिंगवर चर्चा केली जाईल.
केंद्र सरकार एलआयसी आयपीओ (LIC IPO)च्या वेळेचे पुनरावलोकन करू शकते. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील सूचित केले आहे की IPO च्या वेळेवर पुनर्विचार केला जाऊ शकतो.
रशिया-युक्रेन युद्धाने जागतिक बाजारपेठ हादरली आहे. एलआयसीच्या आयपीओवर काम करणाऱ्या एका बँकरच्या मते, विदेशी गुंतवणूकदार बाजारातील अस्थिरतेमुळे घाबरले आहेत. ते त्यांच्या पोर्टफोलिओचा सतत आढावा घेत असतात. अशा वेळी परदेशी गुंतवणूकदार या आयपीओपासून दूर राहू शकतात, ज्यामुळे शेअर्सच्या कामगिरीवरही परिणाम होईल.
रशिया आणि युक्रेन युद्धाचा जागतिक वित्तीय बाजारांवर परिणाम झाला आहे. भारताला देखील याचा फटका बसला आहे. त्यातच केंद्र सरकार LIC चा मेगा IPO पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सरकारने मार्च अखेरपर्यंत हा IPO लाँच करण्याची तयारी पूर्ण केली होती. मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे LIC चा IPO पुढील आर्थिक वर्षात उपलब्ध केला जाऊ शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विमा कंपनीतील आपल्या हिस्सेदारीला अधिकाधिक मूल्य मिळविण्यासाठी सरकार योग्य वेळेची वाट पाहू शकते. सध्या युरोपात रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. त्यामुळे एलआयसी आयपीओ (LIC IPO) उपलब्ध करून देण्यासांदर्भात जागतिक अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीचे आकलन सरकार तर्फे केले जात आहे. सरकार कदाचित LIC चा IPO पुढील आर्थिक वर्षापर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकार या आठवड्यात एक महत्त्वाची बैठक घेणार आहे ज्यामध्ये एलआयसी (LIC)चा आयपीओ (IPO) या वर्षी मार्चमध्ये लाँच केला जाईल की नाही हे ठरवले जाईल. या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, जागतिक परिस्थिती पाहता IPO लाँच करण्याची तारिख बदलली जाऊ शकते.