खडकवासला(पुणे) : खडकवासला धरणतीरावरील मांडवी खुर्द (ता. हवेली) परिसरात बिबट्याची शिकार झाल्याचा प्रकार वन विभागाच्या चौकशीत उघड झाला. याप्रकरणी पुण्यातील एका बड्या हॉटेल व्यावसायिकावर पुणे वन विभागाने गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच हॉटेल व्यावसायिक फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाची पथके रवाना करण्यात आली आहेत. विश्वजित जाधव असे या व्यावसायिकाचे नाव आहे.
मांडवी खुर्द येथील शेट्टी फार्म हाऊसमध्ये बिबट्याची शिकार करून अवयव लपवून ठेवले असल्याची तक्रार प्रसिद्ध हॉटेलचालकाच्या मुलीने वन विभागाकडे केली होती. त्यानुसार पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ यांच्या पथकाने विश्वजित जाधव याच्या फार्म हाऊसवर छापा टाकला. फार्म हाऊसची तपासणी करण्यात आली असता, कपाटात बिबट्याच्या नख्यांसह पंजा आढळला. सराईत शिकार्याने बिबट्याला ठार मारले असावे, असे वन अधिकार्यांचे म्हणणे आहे.
बिबट्याची शिकार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. मृत बिबट्याचा एक पंजा सापडला आहे. मात्र, इतर अवयव सापडले नाहीत. याप्रकरणी विश्वजित जाधवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– प्रदीप सकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी,
पुणे वन विभाग
हेही वाचा