Latest

एसटीच्या संकटकाळात धावून आलेले कंत्राटी चालक वाऱ्यावर; ८०० चालकांवर उपासमारीची वेळ

अविनाश सुतार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा: एसटीच्या संपकाळात आणि कोरोना कालावधीत राज्यभरात नियुक्त केलेल्या कंत्राटी एसटी चालकांना आता कार्यमुक्त करण्यात आले आहे. कोणतीही पूर्वसुचना न देता अचानक त्यांना कामावरुन कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. संकटकाळात धावून आलेल्या राज्यातील सुमारे ८०० कंत्राटी चालक आता नैराश्यग्रस्त झाले आहेत.

शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबर २०२१ पासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा बडगा उगारला होता. अनेक वाटाघाटी करुनही एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने हा संप दीर्घकालीन चालला. या संपामुळे एसटीचे आर्थिक उत्पन्न पूर्णपणे बंद झाले. शिवाय खासगी वाहतूकदारांकडूनही प्रवाशांची अतोनात लूट झाली. या काळात एसटीला वाचविण्यासाठी तसेच प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीमार्फत कंत्राटी चालकांची नियुक्ती केली होती.

राज्यभरात सुमारे ८०० कंत्राटी चालकांना नियुक्त करुन एसटीचा गाडा सुरू झाला. या चालकांना सुमारे ३१ हजार रुपये वेतन देण्याचे ठरले होते. परंतु, चालकांच्या हाती मात्र १५ ते १६ हजार रुपयेच पडत होते. कंत्राटी चालकांच्या मदतीने हळूहळू एसटी महामंडळाची स्थिती रुळावर येत गेली. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतल्यानंतर त्यांना कामावर परत घेण्यात आले. तरीसुद्धा कंत्राटी चालकांची सेवा सुरूच होती. दरम्यान, सन २०१९ च्या भरतीतील चालकांनाही महामंडळात नियुक्ती देण्यात आली.

तेव्हापासून मात्र कंत्राटी चालकांना भवितव्याची चिंता सतावू लागली. अखेरीस ३ सप्टेंबर २०२२ पासून या कंत्राटी चालकांची सेवा समाप्त करुन त्यांना टप्प्याटप्प्याने कामावरुन काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली. भंडारा एसटी विभागातील साकोली आगारातील ४० चालकांनी ३१ ऑक्टोबररोजी त्यांची शेवटची फेरी केली. तेव्हापासून त्यांनाही कामावरुन बंद करण्यात आले. कंत्राटी चालकांनी जिवाची पर्वा न करता अत्यंत कमी पगारात आपली कर्तव्ये पार पाडली. सामान्य प्रवाशांची लूट सुरू असताना ऐनवेळी कंत्राटी चालक धावून आले. परंतु, आज त्यांच्याकडे कोणतेही काम नसल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण, आई, वडिलांचा औषधोपचार, घरखर्च कसा करावा, असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ नोव्हेंबररोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कंत्राटी चालकांनी आपली भावना त्यांच्यासमोर पोटतिडकीने मांडून निवेदन दिले. कंत्राटी चालकांना महामंडळात सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

अचानक कामावरुन कमी केल्याने नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. संकटसमयी धावून आलेल्या राज्यातील कंत्राटी चालकांबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी साकोली येथील कंत्राटी चालक संदीप वाकडे यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT