Latest

स्वातंत्र्यदिन विशेष : गारगोटीत काळरात्रीने घेतला सात क्रांतीकारकांचा बळी

Arun Patil

गारगोटी, रविराज वि. पाटील: १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या सात जणांच्या आठवणी गारगोटीतील क्रांतीज्योतीच्या माध्यमातून आजही ताज्या आहेत (स्वातंत्र्यदिन विशेष). गारगोटी कचेरीवर केलेल्या हल्यावेळी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात सातजण शहीद झाले होते. त्यांच्या आठवणी आजही गारगोटीकरांनी ताज्या ठेवल्या आहेत.

राष्ट्रपिता महात्मा गांधीनी इंग्रजांना 'चले जाव' चा नारा दिला. महात्मा गांधींच्या या नार्‍याने देशभर ब्रिटिशांविरोधात संतापाची लाट निर्माण झाली. सर्वत्र क्रांतीच्या मशाली पेटून उठल्या. यामध्ये कोल्हापूर जिल्हाही अग्रेसर राहिला. देशभक्त रत्नापाण्णा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली भुदरगडमध्येही क्रांतीकारकांची एक तुकडी काम करत होती. या तुकडीने गारगोटी कचेरी लुटण्याचा एक धाडसी बेत आखला होता.

गारगोटीतील सरकारी कचेरीवर ताबा मिळवून तिरंगी निशाण फडकविणे, कचेरीत स्थानबद्ध केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना मुक्त करणे व सरकारी खजिन्यावर हल्ला करून खजिना लुटण्याची योजना आखाली. कोल्हापूरवरून पोलिसांची कुमक गारगोटीपर्यंत पोहचू नये, म्हणून कोल्हापूर गारगोटी मार्गावरील कूर येथे वेदगंगा नदीवरील पुल उडविण्याची धाडसी योजना स्वामी वारके यांनी योजली होती. १३ डिसेंबर १९४२ रोजी खजिना लुटण्याचा बेत पक्का झाला. वेगवेगळे गट पाडण्यात आले.

यामधील एक गट खजिन्याची कुलपे तोडत असताना मॅजिस्ट्रेटचा संरक्षक बाबू जाधव याने केलेल्या हल्ल्यात अंधारात गोळ्या कोठून येतात हे न समजल्यामुळे सात शूरवीर धारातीर्थ झाले. एकाचा पाय अधू होऊन याप्रकरणी सत्तेचाळीस जणांवर खटला भरला गेला.

हुतात्मा करविरय्या स्वामी

बेळगाव जिल्ह्यातील संकेश्‍वर जवळील हरगापूर हे जन्मगाव असलेले आणि दत्तक म्हणून कापशीला आलेल्या स्वामींचे मुळचे गाव गुरूसिद्धय्या आप्पय्या हिरेमठ असे होते. दत्तक गेल्यानंतर करविरय्या सिद्धय्या स्वामी असे त्यांचे नामकरण करण्यात आले. 'माझ्या रक्ताची शपथ आहे. पोलीसांना मारू नका, ते जरी इंग्रजांचे असले तरी आपले देशबांधव आहेत. त्यांच्यापैकी कुणाच्याही जीवाला धक्का लागता कामा नये.'असे ते म्हणाले. पोलीसांचीच गोळी छातीवर झेलून रक्ताच्या थारोळ्यात शेवटची घटका मोजतानासुद्धा पोलिसांच्या जीवाची काळजी करणारे स्वामी खर्‍या अर्थाने महात्मा गांधींजींच्या अहिंसा तत्वाचे पायिक होते.

हुतात्मा नारायण वारके

भुदरगड तालुक्यातीळ कलनाकवाडी या छोटे खानी गावात १९२० मध्ये नारायणरावांचा जन्म झाला. कोल्हापूरच्या प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये रहात असतानाच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. ९ ऑगस्ष्ट १९४२ रोजी महात्मा गांधींना अटक झाली आणि क्रांतीकारक भूमिगत होऊ लागले. नारायणराव वारकेही भूमिगत झाले. कोल्हापूर संस्थांनांचे त्यांच्यावर पकड वॉरंट काढून त्यांना कमरेच्या खाली गोळी घालण्याचा आदेश काढला. पकड वॉरंट आणि गोळी घालण्याचा हुकूम असतानाही नारायणराव वारकेंनी गारगोटी कचेरीसमोर स्वातंत्र्याची जाहिररित्या प्रतिज्ञा करून ब्रिटीश साम्राज्यशाहीला आव्हान दिले. पोलिस अधिकारी बाजूला असतानाही निमूटपणे पहात राहिले. पण या सिंहाच्या छाव्याला गोळी घालण्याची हिंमत कोणाचीही झाली नाही. भूमिगत असताना दसर्‍याच्या सणादिवशी नारायणरावांनी गुलामगिरीतील पुरणपोळीपेक्षा ही नाचण्याची कणसे आणि ओल्या मिरच्या अधिक रूचकर आहेत असे उद्दगार आईसमोर काढले होते. १३ डिसेंबर १९४२ च्या रात्री गारगोटी खजिना लुटताना ते हुतात्मा झाले.

हुतात्मा शंकरराव इंगळे

कापशी (ता. कागल) या जहांगिरीच्या गावी २२ जून १९१८ रोजी शंकररावांचा जन्म झाला. ५ वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर हे जहांगिरीत नोकरीसाठी रूजू झाले. समाजसेवेची परंपरा त्यांच्या वडिलांनी अधिक सुरू करून कापशी भागात प्राथमिक शाळा चालू केल्या होत्या. १९४२ च्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतल्यानंतर शंकरराव एक दिवस घरी आले. आणि आईला म्हणाले, 'आई मला आज तू अंघोळ घाल, जेऊ घाल, आता तुम्ही मला विसरून जा आशिर्वाद दे.' नंतर शंकररराव बाहेर पडले. अन गारगोटीच्या स्वातंत्र्य संग्रामात हुतात्मा झाले.

हुतात्मा तुकाराम भारमल

कागल तालुक्यातील मुरगूडचे रहिवाशी असलेल्या तुकारामांनी वयाच्या १९-२० व्या वर्षीच स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात पडू नये म्हणून समजविणार्‍या क्रांती नेत्यामना मी जरी लहान असलो तरी तानाजीच्या घोरपडीप्रमाणे तुमच्या उपयोगी पडेन असे त्यांनी उत्तर दिले. अन हे उद्दगार खरेही करून दाखविले.

हुतात्मा पैलवान मल्लाप्पा चौगले

कागल तालुक्यातील चिखली गावच्या मल्लाप्पांनी दुसरीत असतानाच शिक्षणाला रामराम ठोकून कुस्तीच्या आखाड्यात रमू लागले. एकापाठोपाठ एक फड जिंकत असतानाच भोळ्या भाबड्या आई-वडिलांनी मल्लापांचे लग्न १० वर्षे वयाच्या आक्काताईंशी लावून दिले. स्वातंत्र्यासाठी तन, मन, धन अर्पण करणारा हा हुतात्मा खजिन्यावर हल्ला करण्यावेळी कोसळला अन शेवटच्या क्षणी त्यांनी हरी बेनाड्यांना आमचे स्वातंत्र्याचे अपुरे स्वप्न पुरे करा, असा संदेश दिला. लग्न होऊन पुरते वर्षही न झालेल्या आक्काताईंवर दुःखाची कुर्‍हायाच कोसळली. त्या वीर पत्नीने आपल्या अमर झालेल्या पतीच्या नावाने उभे आयुष्य काढले.

हुतात्मा बळवंत जबडे

गारगोटी क्रांती संग्रामातील १७-१८ वर्षाचे बळवंतराव हे सर्वांत लहान क्रांतीकारक. स्वातंत्र्याचे वारे लहानपणीच प्यालेल्या बळवंतरावांचा जन्म निपाणीजवळील जत्राट या गावी झाला. निपाणीत हायस्कूलमध्ये शिकत असतानाच त्यांना स्वातंत्र्यलढ्याचे आकर्षण वाटू लागले. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याबद्दल चामडी काढण्याची धमकी देणार्‍या गावच्या पाटलाला त्यांनी 'माझी चामडी काढणारा गब्रू अजून जन्माला यायचा आहे.' असे खणखणीत उत्तर दिले होते. स्वातंत्र्य संग्रामात अनेक आंदोलनात भाग घेणार्‍या या बालविरांची स्वातंत्र्याची पहाट पाहण्याची हौस नियतीने पुर्ण होऊ दिली नाही.

हुतात्मा परशुराम साळूंखे

चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट गावचे रहिवाशी असलेल्या परशुरामांचा जन्म १९४२ मध्ये झाला. १९४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनात वयाच्या १८ व्या वर्षीच त्यांनी स्वतः झोकून दिले. भारतीय इतिहासातील अनेक रत्ने, माणके यापैकीच एक असणारा हा ओजस्वी मणी खजिना लुटीच्यावेळी हुतात्मा झाला अन भारतीय इतिहासात स्वतः बरोबर खडकलाट खेड्याचेही नाव सुवर्णाक्षणात अमरपणे कोरून गेला.

हुतात्म्यांचे स्मरण स्मारकातून

या सात हुतात्माच्या स्मरणार्थ गारगोटी येथील तहसिल कार्यालयासमोर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सात पाकळ्याचे भव्य स्मारक उभे करण्यात आले आहे. हे हुताम्यांचे स्मारक आज ही येणार्‍या पिढ्यांना स्फूर्ती देत उभे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT