Latest

सातारा : प्रेमप्रकरणामुळे खून करून बापानेच पुरला मुलीचा मृतदेह

मोनिका क्षीरसागर

ढेबेवाडी (सातारा)  : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीचे स्वतःच्या चुलत्याबरोबर प्रेमप्रकरण व अनैतिक संबंध आहेत. ती सज्ञान झाल्यावर दोघे लग्‍न करणार आहेत. ही बाब उघडकीस आल्यास आपली बदनामी होईल, समाजात आपली पत राहणार नाही या भीतीने स्वत:च्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह डोंगर पठारावर पुरला. याबाबत खोटी तक्रार करून पोलिसांची दिशाभूल केली. परंतु, पोलिसांनी आई-वडिलांसह मामाला अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

कराड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी शाळेत पुस्तके जमा करण्यासाठी गेली असता तिला कुणीतरी
अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद 18 एप्रिल रोजी दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीवरून कराड तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या आदेशानुसार उपनिरिक्षक दीपज्योती पाटील यांनी त्या मुलीच्या आईकडे कसून तपास केला. त्यावेळी तिच्या आईने दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या चुलत भावाशी मुलीचे अनैतिक संबध आहेत. मुलगी सज्ञान झाल्यावर ती त्याच्याशी लग्न करणार होती. त्यामुळे आपली समाजात पत राहणार नाही, आपली बदनामी होईल या भितीने फिर्यादी व त्याच्या पत्नीने स्वत:च्या मुलीला विश्‍वासात घेऊन डोंगर पठारावर नेले. तेथे मुलीचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नाहीसा करण्यासाठी तिचा मृतदेह खड्ड्यात पुरला, असेही पोलिसांनी सांगितले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक खोबरे यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह उकरून काढला. संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील यांच्यासह पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. कोळे पोलिस ठाण्याच्या सपोनि रेखा दुधभाते अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, संशयित आई-वडिलांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता 5 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर सोमवारी मुलीच्या मामाला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT