Latest

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच श्रेष्ठींना दिला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Shambhuraj Pachindre

नागपूर : पुढारी वृत्तसेवा राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेच्या ज्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन उठाव केला, त्या आमदारांना आम्ही साथ दिली आणि त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलो. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच भाजप श्रेष्ठींना दिला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपुरात सांगितले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकर्‍यांचे, विकासाचे अनेक प्रकल्प थांबले होते. महाविकास आघाडीतील अंतर्विरोध दररोज दिसत होता. शिवसेनेसमोरचे प्रश्‍न तर मोठे होते. त्यांच्या आमदारांमध्ये मोठी नाराजी होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतल्याने अस्वस्थता अधिक होती. यातून शिवसेनेत एक उठाव झाला. ते बंड नाही. त्यातून ते आमच्यासोबत आले आणि आम्ही त्यांना मदत केली, असे फडणवीस म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस मंगळवारी नागपुरात आले असता ते बोलत होते. नागपूर श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या अनौपचारिक वार्तालापात त्यांनी नवे सरकार स्थापनेमागची पूर्वपीठिका कथन केली. तत्पूर्वी, त्यांची फुलांनी सजवलेल्या रथातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. फडणवीस पुढे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठामपणे उभी राहणारी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. पारिवारिक वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असला, तरी वैचारिक वारसासुद्धा महत्त्वाचा असतो. हा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत.

फडणवीस यांनी सांगितले की, आम्ही म्हटले असते, तर मुख्यमंत्रिपद आम्हाला मिळाले असते; पण पदाची लालसा आम्हाला नव्हती. उलट शिवसेनेचाच मुख्यमंत्री करू, हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. नवनियुक्‍त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसविण्याचा निर्णय माझ्या संमतीने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला, अशी स्पष्टोक्‍ती फडणवीस यांनी केली. फक्त या सरकारमध्ये मी स्वतः कोणतेही पद घेणार नव्हतो. बाहेर राहून सरकार चालविता येत नाही हे मला भाजपाच्या शिर्षस्थ नेत्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या आग्रहाने मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, असेही फडणवीस म्हणाले.

माझ्या पत्रकार परिषदेनंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांचा मला फोन आला त्यांनी मला सांगितले की नव्या सरकारमध्ये सामील व्हा. त्यामुळे पक्षाच्या आदेशाने मी सरकारमध्ये सामिल झालो आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री पद स्वीकारणे हे मी कमीपणाचे समजत नाही, असेही ते म्हणाले. राज्यात झालेल्या सत्तासंघर्षात गृहमंत्री अमित शहा आमच्या पाठीमागे पहाडासारखे उभे राहिले त्यामुळे त्यांचे आम्ही त्यांचे आभार मानले. राज्यात झालेला सत्तासंघर्ष ही एक सस्पेन्स फिल्म आहे. मविआ सरकार स्थापन झाले तेव्हापासूनच या सरकारमध्ये खदखद सुरू होती. त्यावर मी नजर ठेवून होतो असेही त्यांनी सांगितले. राज्यात सत्तांतर होऊन आम्हाला हे जे यश मिळाले आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाले असल्याचेही ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणातील त्रुटी लवकरच दूर करू

मागील दोन वर्ष राज्य विधीमंडळाचे अधिवेशन नागपुरात झाले नाही. मात्र यावेळी हिवाळी अधिवेशन नागपुरात होईल. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लवकरात लवकर अहवाल प्राप्त करून तो सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने बैठक सुद्धा झाली. हा अहवाल वेळेत न्यायालयात सादर करण्याला प्राधान्य आहे.ओबीसी समाजाला त्यांचा हक्क लवकरात लवकर प्राप्त व्हावा, हाच उद्देश आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात काही त्रुटी राहिली असेल तर ती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आरक्षणाच्या विषयावर छगन भुजबळ आणिविजय वडेट्टीवार यांच्या सोबतही चर्चा करणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT