बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
हिजाब प्रकरणानंतर आता शिमोगा येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या हत्येमुळे शहरातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. पण, हिजाबप्रकरणी मराठी युवकांनी संयम दाखवून ज्या प्रकारे तटस्थ भूमिका घेतली. प्रशासन आणि सरकारचे काम सरकारला करू दिले. त्याचप्रमाणे आताही धार्मिक वादात न अडकला शिमोगाप्रकरणी प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करण्यापासून लांब राहणे आवश्यक आहे, असे जाणकारांचे मत आहे. मराठी युवकांची अलिप्त भूमिका परिणामकारक ठरली असून धार्मिक राजकारण करणार्यांना चांगलाच फटका बसला आहे.
आता हिंदूत्ववादी कार्यकर्त्याच्या हत्त्येविरोधात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. शिमोगा येथे घटना घडली आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी काही बोलत नाहीत. तरीही सोशल मीडियावर चर्चा रंगत आहेत. त्यामुळे हे प्रकरण हाताळण्यास सरकार आणि लोकप्रतिनिधी सक्षम आहेत. या वादात मराठी युवक पडले की त्यांच्यावरच गुन्हे नोंद होण्याची शक्यता अधिक आहे. पोलिस सोशल मीडियावर नजर ठेवून आहेत. आताही काहींकडून सीमाभागातील मराठी भाषिकांना धर्माच्या आधारावर भडकावून राजकीय पोळी भाजून घेण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचे दिसून येतोय. त्यामुळे याप्रकरणी हस्तक्षेप न करता सरकारला त्यांचे काम करू देणे आवश्यक आहे. ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा अपमान झाला, मणगुत्ती येथील शिवपुतळा दीड वर्षांपासून प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवण्यात आला. त्याविरोधात मराठी भाषिकांच्या बाजूने कोणीही भूमिका घेत नाही. त्यामुळे मराठी युवकांनी हिजाबप्रमाणे शिमोग्यातील घटनेत सरकारच्या कामात हस्तक्षेप करू नये, असे जाणकारांचे मत आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्यात येत नाहीत. उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते. केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या तरतुदींना जुमानत नाही. मराठी बोलले तर दखल घेतली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे, सोशल मीडियावर अपमान होतो. त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि इतर संघटनाही बोलण्यास तयार नसतात, हा अपमान नव्हे काय, असा सवाल उपस्थित होत असून वादाच्या आणि निवडणुकीच्या काळातच मराठी युवक आठवडो का, याचे विचारमंथन करणे आवश्यक आहे, असेही लोकांचे म्हणणे आहे.
सामाजिक शांतता बिघडवणारे भडकावू व आक्षेपार्ह संदेश व्हॉट्सअॅवर फिरविणार्या चौघांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दोघांवर मार्केट ठाण्यात तर दोघांवर वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करून घेतला आहे.
हेही वाचलत का ?