Latest

पर्सनल लोन की गोल्ड लोन?

Arun Patil

पैशाची अचानक गरज भासल्यास बहुतांश मंडळी पर्सनल लोनचा आधार घेतात. पर्सनल लोनचा व्याजदर हा तुलनेने अधिक आहे. त्याचा व्याजदर पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. परंतु अशा काळात वैयक्तिक कर्ज घेण्याऐवजी गोल्ड लोन घेतले, तर तो फायद्याचा व्यवहार ठरू शकतो.

गोल्ड लोन हे फायद्याचे ठरू शकते कारण त्याचा व्याजदर बर्‍याच प्रमाणात कमी आहे. कोणतीही व्यक्ती गोल्ड लोनच्या माध्यमातून कमी खर्चाची आर्थिक गरज पूर्ण करू शकते.

कोरोना काळात अनेकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे. तर काहींना बरेच महिने विनावेतन काम करावे लागले आहे. अशा वेळी काहींनी आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी पर्सनल लोनची मदत घेतली. परंतु या कर्जामुळे त्यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.

नोकरी पुन्हा मिळाली तर पर्सनल लोन तेत्काळ फेडू, या विचारातून अनेकांनी या पर्यायाची निवड केली. परंतु कोरोना काळात दुसर्‍या लाटेने स्थिती आणखीच बिघडली गेली आणि नवीन जॉब तर मिळाला नाही, उलट कपात केलेली सॅलरीदेखील मिळाली नाही. या स्थितीत पर्सनल लोन घेतलेल्या नागरिकांना कर्ज फेडणे कठीण जाऊ लागले. त्याचवेळी व्याजही वाढू लागले.

वैयक्तिक कर्जावरचा व्याजदर अधिक असल्याने कर्जाची रक्कम ही वाढतच गेली. या स्थितीपासून वाचण्यासाठी गोल्ड लोन हा चांगला पर्याय ठरू शकला असता. त्यात कमी व्याजावर कर्ज मिळाले असते. त्यामुळे आपण एखाद्या कामासाठी पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल, तर एकदा तरी गोल्ड लोनचा विचार करायला हरकत नाही.

पर्सनल लोन

पर्सनल लोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जादा व्याजदर. सर्वसाधारपणे पंधरा ते 18 टक्के दराने व्याजदरावर कर्ज वाटप केले जाते. व्याजदर अधिक असण्याबराबेरच हप्ता भरण्यास उशीर झाला, तर संपूर्ण रकमेवर काही दंड आकारला जातो. त्यामुळे त्याची रक्कम ही वाढतच जाते.

याशिवाय पर्सनल लोनमध्ये अनेक औपचारिकता पार पाडाव्या लागतात. काही वेळा बँका हमी चीही मागणी करतात. लिक्विड गॅरंटी रूपातून विमा पॉलिसी, घराचे कागदपत्रे याचीही मागणी करू शकतात. एखाद्या ग्राहकाच्या आर्थिक स्थितीबाबत बँकांना संशय आला, तर ते हमीबाबत आग्रही असतात.

या कर्जासाठी कर्जदार आणि बँक यांच्यात करार होतो. त्यात किमान 30 ते 35 ठिकाणी स्वाक्षर्‍या केल्या जातात. एकुणात, पर्सनल लोनमध्ये खूपच औपचारिकता पार पाडावी लागते. खासगी क्षेत्रात तर काही कंपन्या काही मिनिटांतच कर्ज देऊ, असे सांगतात. अशा कंपन्यांपासून आपण सावध राहिले पाहिजे. आरबीआयनेदेखील मोबाईलवरून कर्ज देणार्‍या कंपन्यांपासून सजग राहण्याची सूचना केली आहे.

गोल्ड लोनचे वैशिष्ट्य

गोल्ड लोन योजना ही बँकांकडून सोने तारण ठेवून कर्ज देण्याची सुविधा प्रदान केली जाते. बँकेशिवाय सोन्याशी निगडित असलेल्या अन्य कंपन्यांदेखील सोने तारण कर्ज देतात. बँकांत गोल्ड लोनवरून फारशी औपचारिकता पार पाडली जात नाही. जर बँकेत खाते असेल, तर आपल्याला केवळ सोने घेऊन बँकेत जावे लागेल. सोन्याची शुद्धता तपासल्यानंतर बँक आपले कर्ज मंजूर करेल. गोल्ड लोनचे व्याजदर फारसे नसते.

पर्सनल लोनचे व्याजदर हे पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक राहते. तर गोल्ड लोनवर सध्या किमान सात टक्के तर कमाल 11 ते 12 टक्के दराने कर्ज मिळत आहे. बँक सर्वसाधारपणे सोन्याच्या मूल्याच्या 75 टक्के रक्कम कर्जरूपातून देते. तर सोन्याशी निगडित असलेल्या कंपन्या 85 टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. गोल्ड लोन घेण्यापूर्वी प्रिपेमेंट चार्ज, प्रोसेसिंग फीस आदी शुल्काची माहिती घेणे गरजेचे आहे. कारण कर्ज मंजूर करताना बँकांकडून केली जाणारी शुल्क वसुली ही पर्सनल लोनच्या व्याजदराला अ‍ॅडजेस्ट करणारी तर नाही ना, याची पडताळणी करायला हवी.

SCROLL FOR NEXT