Latest

पंढरपूर : पुन्हा शेतकरी जन्म नको म्हणत ‘त्याने’ संपवली जीवनयात्रा, कर्जबाजारी तरुणाने विषप्राशन करत बनविला व्हिडिओ

अमृता चौगुले

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : शेतीत काबाडकष्ट करूनही कर्जाचा डोंगर व कुटुंबाचे हाल संपता संपेना! दारिद्य्रामुळे निराश झालेल्या पंढरपूर तालुक्यातील सूरज रामा जाधव (वय 26) या युवकाने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. मगरवाडी येथील सूरज जाधव याने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड केला. 'आता पुन्हा शेतकर्‍याचा जन्म नको', अशी हृदयाला पाझर फोडणारी करूण कहाणी सांगून त्याने विषाचे घोट घेतले. सरकारला शेतकर्‍यांची काळजीच नाही.

शेतकरीही हक्कांसाठी लढत नाहीत. शेतकर्‍याचे आयुष्य नकोच म्हणून मी ते संपवत आहे. पुढचा जन्म मी शेतकरी म्हणून घेणार नाही, अशी 'दुर्दम्य' निराशाही त्याने मृत्यूला कवटाळताना आळवली. सूरजने बुधवारी (दि. 2) विष घेतले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. 4) रोजी त्याने जगाचा निरोप घेतला.

दरम्यान, शेतीच्या विज बिलाचा हा पहिला बळी असल्यााबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सूरजने लहानपणापासूनच आई-वडिलांना शेती कामांना हातभार लावत शिक्षण घेतले. सर्वांना लळा लावत आणि कष्टाची तमा न बाळगता आयुष्यात काहीतरी करण्याच्या उमेदीने तो झटत होता. आई-वडील व दोन भावंडे अडीच एकर शेतात राबत होती. पण कधी ओलातर कधी सुका दुष्काळ पाचवीला पुजलेला होता. त्यातून कसे-बसे दहावीपर्यंत त्याने शिक्षण घेतले.

त्यानंतर पुढे त्याने शेतीच करण्याचा निर्णय घेतला. त्यातच भागात पाण्याची सोय झाल्याने शेतात जाधव कुटुंबाने ऊस लावण्याचा निर्णय घेतला. अडीच एकरात उसाची लागण केली होती. पाण्याची सोय, कृषी पंप, बी-बियाणे, खतांसाठी साहजिकच सूरज याने कर्जाचा आधार घेतला होता. त्यासाठी खस्ता खाल्ल्या.

दोन वर्षांपासून खर्चाचा मेळ काही लागत नव्हता. यातून डोक्यावर सुमारे 20 लाखांपेक्षा अधिक कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यात कृषीपंपाचे बीलही थकत गेले होते. भरीस भर म्हणून दोन वर्षांत कोरोनाचा मारा आणि त्यामुळे आर्थिक कोंडी सहन करावी लागली होती. तरीही ऊस गेल्यानंतर येणार्‍या बिलांतून कर्जाचा बोजा कमी होईल, वीजबिलाचीही रक्कम भरता येईल असे त्याने थकबाकीदार, वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनाही सांगितले. त्यासाठी विनवण्या केल्या. पण वीजबिलाच्या सक्तीपोटी अधिकार्‍यांनी कडक पावले उचलली.

यातून सूरज जाधव याच्या शेतातील डीपीवरील वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे हातातोंडाला आलेल्या उसाला पाणी उपलब्ध असूनही वीजेअभावी देणे शक्य होत नव्हते. यासाठी शासकीय कार्यालये, वीज कंपनीकडे, संघटनांकडेही त्याने हेलपाटे मारले. पण त्याला त्यातून कोठेच आशेचा किरण दिसला नाही. अखेर या सर्वाला तो कंटाळला.

डोळ्यासमोर पीक वाळत असल्याने तो खचला होता. अशा अवस्थेत 20 लाख रुपये कर्ज कसे फेडायचे, याची भीती सूरजला सतावत होती. त्यामुळे नैराश्यातून अखेर त्याने स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने विषारी औषध आणले. आई-वडीलांना सांगून तो बुधवारी शेतातील डिपीजवळ गेला. तेथे त्याने विषारी औषध प्राशन केले. ते करताना त्याने स्वत:चा व्हिडिओही बनविला.सूरज जाधव याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

वीज बिल आंदोलने बेदखल; अन् पहिला बळी

वीज बिलासाठी महावितरणने शेती पंपाची वीज तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. याविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातही आंदोलन झाले. मात्र, शासनाकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून याबाबत गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे दिसून येते. कर्जबाजारीपणा आणि वीज तोडल्यामुळे सूरज जाधव याने आत्महत्या केली.

SCROLL FOR NEXT