पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : नाशिकचे जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या बदलीला जिल्हावासीयांनी विरोध दर्शविला असून, पाटील यांची अन्यायकारक बदली तात्काळ रद्द करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष आणि सामान्य जनतेला कायदा सुव्यवस्था बहाल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना काम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी काही मंडळींनी अवेळी बदलीनाट्याची स्क्रिप्ट लिहिल्याचा आरोप पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. ही बदली तात्काळ रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी आणि जिल्हावासियांनी दिला आहे.
गेल्या सप्टेंबर २०२० मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता पाटील यांनी कठोर पाऊले उचललली. त्यातून काही मंडळींचे हितसंबंध टोकाचे दुखावले गेल्याने त्यांच्या बदलीचे षडयंत्र राबवून ते अंमलातही आणले गेले. अवघ्या दहा अकरा महिन्यात सचिन पाटील यांच्यासारखा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी या जिल्ह्यातून कार्यकाल पूर्ण होण्याआधीच बदलून जात असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात राहणारा सामान्य माणूस तसेच शेतकरीवर्ग प्रचंड नाराज असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
ही नाराजी असंतोषात प्रगट होऊन आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. सचिन पाटील यांच्या बदलीमागे शेतकऱ्यांना फसविणारी चांडाळ चौकडी रोलेटचा जुगार चालविणारे, विविध प्रकारचे अवैध धंदे चालक, गुटखा आणि रेती तसेच भुमाफीया आणि या सर्व अवैध प्रवृत्तींना अभय देणारे राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्ह्यातच नव्हे तर देशात संवेदनशील म्हणून ओळखला जाणाऱ्या मालेगाव शहर परिसरात सामाजिक सलोखा वृध्दींगत होण्यासाठी पोलीस अधिक्षक म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. आठवड्यातील दोन दिवस मालेगावमध्ये डेरा टाकून परिस्थितीवर नजर ठेवणारे पहिले अधिक्षक म्हणून सचिन पाटील यांचे नाव पोलीस खात्याच्या इतिहासात कोरले गेले आहे.
अशा या कर्तव्यतत्पर अधिकाऱ्याला कार्यकाल पुर्ण करण्याची संधी न देता बदली करणे अन्यायकारक तर आहेच परंतु, सरकारकडून जनतेशी झालेली प्रतारणादेखील आहे. अशा अधिकाऱ्यांना सन्मानित करण्याऐवजी चांगल्या कामासाठी दंडीत करण्याची ही प्रथा मोडीत काढाल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
ही बदली तात्काळ रद्द करून नाशिक जिल्ह्याला न्याय द्यावा, अन्यथा इच्छा नसतानाही जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेला रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
अवघ्या दहा महिन्यांच्या अल्प कार्यकाळात सचिन पाटील यांनी शेती मालाचे पैसे बुडवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या, तरूणाईला आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या रोलेट जुगाराच्या बादशहाला वेसण घातली, महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा व्यापार रोखण्याचा प्रयत्न केला,
आमदाराच्या आप्तस्वकीयाचा बेकायदेशीर बायोडिझेल पंप उध्वस्त केला, इतकेच नाही तर तरूण पिढीला बरबादीच्या वाटेला घेऊन जाणारे अवैध हुक्का पार्लर ,रेव्ह पार्टींवर कठोर कारवाई करून मुंबईची नाशिक जिल्ह्यात येऊ घातलेली गुन्हेगारी संस्कृती वेशीवर थांबवली, अशा नाना प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न सचिन पाटील यांनी प्रामाणिकपणे केला आहे.
पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांची बदली जिल्हावासियांवर उगवलेला सूड आहे, अशा भावनांचा आशय असलेला मजकूर फेसबुक, व्हाटसॲप, ट्विटर, इन्स्टाग्रामवर गुरूवार संध्याकाळपासून मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे.
काही चाहत्यांनी 'वुई सपोर्ट एसपी सचिन पाटील', 'बदली थांबवा जिल्हा वाचवा', 'आम्ही सारे शेतकरी, सामान्य नाशिककर' असा हॅशटॅग चालवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह शरद पवार, पोलीस महासंचालक यांनाही टॕग केले आहेत. अनेकांनी गृहखात्याला मेलही धाडून सचिन पाटील यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.