Latest

पाटण नगरपंचायत : थंडीतही प्रचाराचा हायहोल्ट ड्रामा, गारठलेले मतदार चार्ज; जेवणावळी, रंगीत पार्ट्यांचा धडाका

backup backup

पाटण : गणेशचंद्र पिसाळ

पाटण नगरपंचायत दुसर्‍या टप्प्यात चार प्रभागातील निवडणूक प्रचाराला कोरोनाचे ग्रहण तर दुसरीकडे कडाक्याच्या थंडीने घेरले आहे. मात्र अशातही आरोप, प्रत्यारोप, वचन व जाहीरनाने सादर करत धुमधडाक्यात प्रचार सुरू आहे. गारठलेल्या मतदारांना चार्ज करण्यासाठी उमेदवार अनेक शकला लढवत आहेत.

सोशल मीडियावरही प्रचाराचा धुरळा उडत आहे. पाटण नगरपंचायत निवडणुकीत पहिल्या टप्प्यात तेरा प्रभागांसाठी सत्ताधारी पाटणकर गट, शिवसेना ना. देसाई गट, भाजपा, राष्ट्रीय काँग्रेस, अपक्ष बंडखोर असे एकूण 41 उमेदवार रिंगणात होते. उर्वरित चार प्रभागासाठी तब्बल 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काही प्रभागात सत्ताधारी पाटणकर गटातच मैत्रीपूर्ण लढती असल्याने उमेदवार संख्या जास्त आहे. मतदारांना जेवणावळी, रंगीत संगीत, गुलाबी पार्ट्या देणार्‍या उमेदवार व कार्यकर्त्यांवर निवडणूक व पोलिस यंत्रणेचे बारीक लक्ष आहे .

कोरोना पार्श्वभूमीवर दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदीचे आदेश असल्याने याचा उमेदवारांना फटका बसत असला तरी त्यावरही मात करत प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. परंतु काही ठिकाणी उमेदवार, कार्यकर्ते, मतदारांची तोबा गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा, याशिवाय मास्क, सॅनिटायझर वापराबाबत दुर्लक्ष दिसत आहे.

कडाक्याची थंडी असल्याने बहुतांशी मंडळींना थंडी, ताप,खोकला, सर्दी असली तरी हौश्या नौश्यांच्या प्रचार यंत्रणात आजारी मंडळीही हिरिरीने सहभागी आहेत.

कोरोना निर्बंध व भविष्यातील धोक्याचाही गांभीर्याने विचार व्हावा अन्यथा मतदान, मतमोजणी होईल कोणी निवडून येईल, कोणाचा पराभव होईल परंतु यात दुर्दैवाने कोरोनामुळे कोणाचा नाहक बळी जाऊ नये याची दक्षता कार्यकत्यांनी घेण्याची गरज आहे. प्रशासनानेही याबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

मैत्रीपूर्ण लढतीतही आमने-सामने

तालुक्यात पाटणकर -देसाई आमने-सामनेची राजकीय परंपरा आहेच. नगर पंचायतीतही पाटणकर गटाच्या मैत्रीपूर्ण लढतीत इच्छुकांत प्रभाग तीन मध्ये कराड जनता बँकेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपकसिंह पाटणकर व अ‍ॅड. सचिन देसाई यांच्यात कडवी झुंज होण्याच्या शक्यता होत्या,पण शेवटच्या क्षणी या दोन्ही मान्यवरांनी माघार घेतली.आता प्रभाग दहामध्ये सुधीर पाटणकर व चंद्रकांत देसाई यांच्या मैत्रीपूर्ण लढतीमुळे येथे पाटणकर देसाई आमने-सामने लढत आहेच.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT