Latest

चीन कडे २०३० पर्यंत असतील हजार अण्वस्त्रे; पेंटॅगॉनचा अहवाल

अमृता चौगुले

चीन स्वतःची आण्विक ताकद वेगाने वाढवत असून, येत्या 9 वर्षांत म्हणजेच 2030 पर्यंत चीनकडे एक हजार अण्वस्त्रे असतील, असे अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटॅगॉनच्या एक अहवालातून समोर आले आहे. अमेरिकन अधिकार्‍यांचा एका वर्षात जितका अंदाज होता तो खोटा ठरवत त्यापेक्षाही वेगाने चीन अण्वस्त्रनिर्मिती करत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

मिलिट्री अँड सिक्युरिटी डेव्हलपमेंटस् इन्व्हॉल्विंग पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना 2021 असे या अहवालाचे नाव आहे. हा अहवाल डिसेंबर 2020 पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे. यात चीनने गत उन्हाळ्यात हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांची चाचणी केल्याबाबत काहीही उल्लेख नाही. अहवालात म्हटले आहे की, आगामी सहा वर्षांत चीनकडील अण्वस्त्रांची संख्या सातशेच्यावर जाईल तर 2030 पर्यंत हा आकडा एक हजाराच्या पुढे जाईल. दरम्यान, या अहवालात चीनकडे आजघडीला किती अण्वस्त्रे आहेत, त्याची माहिती दिलेली नाही. मात्र, एक वर्षापूर्वी चीनकडे जवळपास 200 अण्वस्त्रे असतील, असा अंदाज पेंटॅगॉनने व्यक्‍त केला होता आणि त्यांची संख्या या दशकाच्या अखेरपर्यंत दुप्पट होईल, असा अंदाज पेंटॅगॉनच्या अधिकार्‍यांना होता.\

सर्व प्रकारच्या युद्धात चीनचे आव्हान तगडे

या अहवालात चीनसोबत खुलेआम युद्धाचा पर्याय देण्यात आलेला नाही. मात्र, पीपल्स लिबरेशन आर्मीमुळे अमेरिका चिंतीत आहे. चिनी सैन्य अमेरिकेला सर्व प्रकारच्या युद्धात म्हणजेच जमिनीवर, समुद्रात, हवेत आणि अंतराळासह सायबरस्पेसमध्येही आव्हान देऊ शकते. तसेच, तैवानबाबतही चीनच्या भूमिकेवरून अमेरिकेतील सैन्य अधिकारी चिंतेत आहेत.

एलएसी भागात फायबर ऑप्टिक नेटवर्क

अहवालात म्हटले आहे की, चीनने भारताला लागून असलेल्या एलएसी भागात फायबर ऑप्टिक नेटवर्क उभारले आहे. कम्युनिकेशनचा वेग वाढविण्यासाठी तसेच परेदशी घुसखोरांबाबत सतर्कतेसाठी चीनने ही पायाभूत सुविधा उभारली आहे. एलएसीवर होत असलेल्या कुरबुरींमुळे चिनी सैन्याने सीमेवर मोठ्या संख्येने सैनिक तैनात केले होते.

युरोपियन महासंघाचा चीनविरोधात तैवानला पाठिंबा

ब्रुसेल्स ः वृत्तसंस्था
चीन सातत्याने तैवानवर हक्‍क सांगत असताना आता अमेरिकेपाठोपाठ युरोपियन महासंघाने उघड उघड चीनविरोधी भूमिका घेत तैवानला पाठिंबा दिला आहे. युरोपियन युनियनच्या एका शिष्टमंडळाने नुकताच तैवान दौरा केला. यावेळी या तैवान एकटे नसून आम्ही तैवानसोबत आहोत, असे या शिष्टमंडळाने तैवानला सांगितले.

तैवानविरोधात चीन आक्रमक भूमिका घेत असल्याने जागतिक स्तरावर चीनला एकटे पाडण्याचा प्रयत्न अमेरिकेपाठोपाठ युरोपियन महासंघाकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीन कधीही तैवानवर आक्रमण करू शकतो, अशी भीती व्यक्‍त केली होती. गेल्या महिन्यात तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्सेई इंग-वेन यांनी युरोपचा दौरा केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT