Latest

गोवा : १ जून ते ३१ जुलै दरम्यान खोल समुद्रात मासेमारीस बंदी

मोनिका क्षीरसागर

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात खोल समुद्रात मासेमारीसाठी 1 जूनपासून बंदी घालण्यात आली असून 1 जून ते 31 जुलै 2022 असे दोन महिने खोल समुद्रात ट्रॉलरच्या साहाय्याने मासेमारी करण्यास ही बंदी असेल. ही माहिती मच्छीमारी खात्याच्या उपसंचालक डॉ. स्मीता मुजमदार यांनी दै. 'पुढारी'स मंगळवारी दिली.

उपसंचालक डॉ. स्मीता मुजमदार यांनी सांगितले, की जून व जुलै या पावसाळी महिन्यात दरवर्षी गोव्यासह किनारी भागातील राज्यात मासेमारी बंदी असते. काही राज्यात कालावधी वेगळा असतो. जून व जुलै महिन्याचा काळ हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे समुद्रधन वाढावे यासाठी ही बंदी असते. दुसरीकडे जोरदार वादळी पावसामुळे खोल समुद्रात जाणे शक्य नसते. मच्छीमारांसाठी वादळी पाऊस धोकादायक असतो. त्यामुळे हे दोन महिने खोल समुद्रात मासेमारीला बंदी असणार आहे. नद्यांत मासेमारी करण्यास बंदी नसली तरी जोरदार वादळी पावसावेळी नागरिकांनी मोठ्या नद्यांमध्येही मासेमारीसाठी उतरू नये.

राज्यात 1 जूनपासून मासेमारीवर बंदी राहणार असल्याने खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणारे सुमारे 800 ट्रॉलर बंद राहणार आहेत. तसे पाहता गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे ट्रॉलरवर काम करणारे झारखंड, आसाम येथील सर्व कामगार कामावर आलेले नाहीत त्यामुळे मच्छीमारी खात्याकडे नोंद असलेल्या 870 पैकी बरेच ट्रॉलर बंदच आहेत. राज्य सरकारच्या मच्छीमारी खात्याकडे लहान होडी व ट्रॉलर मिळून 2971 होडी ट्रॉलर नोंद आहेत. यात सर्वात जास्त संख्या मोटल लावून किनार्‍यावर व नद्यांतून मासे मारी करणार्‍या कॅनोंचा (2101) समावेश आहे, अशी माहिती डॉ. मुजुमदार यांनी दिली.

हेही वाचलत का?

SCROLL FOR NEXT