Latest

कोल्हापूर : कोयना, महाराष्ट्र एक्स्प्रेस धावणार इलेक्ट्रिक इंजिनवर

सोनाली जाधव

कोल्हापूर : अनिल देशमुख
कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गावर डिझेल इंजिनऐवजी आता इलेक्ट्रिक इंजिन वापरले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रदूषण आता कमी होणार आहे. 3 जूनपासून त्याचा प्रारंभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर-मुंबई 'कोयना एक्स्प्रेस' आणि कोल्हापूर-गोंदिया 'महाराष्ट्र एक्स्प्रेस' या दोन गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार आहेत. वर्षअखेरपर्यंत या मार्गावरील सर्वच गाड्या इलेक्ट्रिक इंजिनसह धावतील.
कोल्हापूर-मिरज या 48 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मिरज ते पुणे या मार्गाचे दुहेरीकरण सुरू आहे. मात्र त्यापैकी एका मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे कोल्हापूर-पुणे असा विद्युतीकरणाचा एक मार्ग खुला झाला आहे. या मार्गावर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक इंजिन वापरण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याची तयारी रविवारपासून सुरू करण्यात आली आहे.

दोन्ही एक्स्प्रेस प्रायोगिक तत्त्वावर

कोल्हापुरातून सुटणार्‍या महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि कोयना एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनसह 'ट्रायल बेस' म्हणून चालवल्या जाणार आहेत. विनाअडथळा या गाड्या धावायला लागल्यानंतर पुढील काही दिवसांतच जसजसे इंजिन उपलब्ध होतील, त्यानूसार कोल्हापूर रेल्वे स्थानकातून जाणार्‍या व येणार्‍या सर्वच एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनसह धावणार आहेत. कोल्हापूर-मिरज मार्गावर 8 एक्स्प्रेस आणि चार पॅसेजर अशा एकूण 24 गाड्यांची ये-जा सुरू असते. या सर्व गाड्यांना डिझेल इंजिन वापरले जाते. गती वाढवताना मोठ्या प्रमाणात काळा धूर हवेत सोडत या गाड्या धावत असतात. या मार्गावर गाड्यांची गती वाढवण्यात येणारी रेल्वे फाटक, मार्केट यार्ड, वळीवडे फाटक आदी ठरावीक ठिकाणे आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर हवेत मिसळत असल्याने त्या परिसरात प्रदूषणाची पातळी वाढत असते. आता पहिल्या टप्प्यात काही प्रमाणात का होईना, या प्रदूषणात घट होणार आहे. वर्षभरात या मार्गावर रेल्वेने होणारे प्रदूषण पूर्णपणे बंद होणार आहे. इलेक्ट्रिक इंजिनमुळे वेग वाढणार आहे. परिणामी भविष्यात प्रवासाचा कालावधीही कमी होण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT