कॅनबेरा : 'प्रेम आंधळे असते' किंवा 'प्रेमाला वय नसते' वगैरे म्हणतात ते खरेच असते असे दाखवणारी एक घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे. तिथे 80 वर्षांचे एक आजोबा 84 वर्षांच्या एका आजीबाईंच्या प्रेमात इतके वेडे झाले की त्यांनी या आजीबाईंना चक्क पळवून नेले. मात्र, त्यांची कहाणी इतकीच नाही, त्यामधील भावनांची खोली पाहिल्यावर कुणाचेही डोळे पाणावू शकतात!
या आजोबांचे नाव आहे राल्फ गिब्स व त्यांच्या या गर्लफ्रेंडचे नाव आहे कॅरोल लिस्ले. कॅरोलआजी या डिमेन्शिया आणि पार्किन्सन या आजारांनी ग्रस्त आहेत. विस्मरणाचा आजार आणि कंपवाताचा एकाचवेळी सामना करीत असलेल्या या आजीबाई कोणतीही गोष्ट चटकन विसरतात. त्या स्वतः आधाराशिवाय चालू शकत नाहीत व त्यांना सतत इतरांची मदत लागते. त्यामुळे त्या पर्थ शहरातील एका नर्सिंग होममध्ये राहून तिथे उपचार घेतात. तिथे येण्याच्या आधीपासूनच राल्फ आणि कॅरोल यांचा परिचय होऊन दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, कॅरोल नर्सिंग होममध्ये आल्यानंतर दोघांची ताटातूट झाली व हा दुरावा राल्फ यांना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी कॅरोल यांना या नर्सिंग होममधून चक्क पळवून नेले व ते ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या शहरांत फिरू लागले. ही 'सैराट' जोडी पर्थपासून 4800किलोमीटर दूर क्विन्सलँडला जात असताना एका वाळवंटी प्रदेशात पोलिसांनी त्यांना पकडले. 43 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या या भागात ते गाडी चालवत जात होते. कॅरोल भेदरलेल्या अवस्थेत पोलिसांना दिसून आल्या. त्यांना तिथूनच एअरलिफ्ट करून पर्थला पुन्हा पाठवण्यात आले आणि राल्फ यांना अटक करण्यात आली. कॅरोल यांचा जीव धोक्यात टाकणे वगैरे अनेक आरोप त्यांच्यावर लावण्यात आले. कोर्टात सुनावणीवेळी त्यांनी आपण हे सर्व प्रेमाखातर केले असे त्यांनी सांगितले. गेल्या पंधरा वर्षांपासूनची ती आपली जोडीदार असून उरलेले दिवस तिच्यासमवेत घालवण्याची आपली इच्छा होती असे त्यांनी सांगितले. न्यायाधीशांनी त्यांचे म्हणणे सहानुभुतीने ऐकून घेतले; पण कायद्यानुसार त्यांना सात महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला. एरव्ही रुग्णाजवळ राहणे जवळच्या नातेवाईकांनाही आवडत नसते; पण राल्फ यांना त्यांचा अशा स्थितीतही सहवास हवा होता हे विशेष!