मुंबई; अजय गोरड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सदस्यांच्या नियुक्तीच्या फाईलवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर बुधवारी रात्री उशिरा सही केली. एमपीएससी उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलाखत प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. या मुलाखत प्रक्रियेला वेग येण्यासाठी आयोगातील रिक्त पदांवर तातडीने नियुक्ती होणे आवश्यक आहे.
त्यामुळे आपण तातडीने त्याला मंजुरी द्यावी, अशी विनंती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपालांकडे बुधवारी सायंकाळी 6 वाजता केली होती. त्यानंतर काही तासांतच राज्यपालांनी फाईलवर स्वाक्षरी केल्याने भरणे यांच्या प्रयत्नांना यश आले.
एमपीएससीच्या रिक्त 4 सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारने मागील आठवड्यात राज्यपालांकडे 7 नावांची यादी मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती.
त्यानंतर चार दिवसांपूर्वीच सदस्यांच्या नियुक्तीची फाईल राज्यपालांकडे पाठवूनसुद्धा राज्यपाल त्यावर निर्णय घेत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती.
त्यावर राजभवनाने स्पष्टीकरण देत संबंधित फाईल सोमवारी (ता.2) राजभवनात पोहोचल्याचे सांगितले. यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
सध्या एमपीएससीद्वारे भरल्या जाणार्या रिक्त पदाची संख्या जवळपास 20 हजारांच्या घरात आहे. साडेपंधरा हजार भरण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. आयोगावर सध्या पाच सदस्य आणि एक अध्यक्ष आहे. केरळ राज्याच्या धर्तीवर आयोगावरील सदस्यांची संख्या 6 वरून 13 पर्यंत करण्याचा विचार आहे, असे भरणे म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी रात्री फाईलवर सही केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांनी राजभवनात जाऊन फाईल घेतली.
मात्र, राज्यपालांनी कोणत्या नावाला हिरवा कंदील दाखविला हे स्पष्ट होऊ शकले नाही. राज्य सरकारने सेवानिवृत्त सनदी अधिकारी राजीव जाधव आणि निवृत्त आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांची नावे दिली आहेत.