नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: आयकर विभागाने गुरूवारी (दि.२२ जून) राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये धाडी टाकल्या. सोने खरेदी-विक्रीमधून जमवण्यात आलेला काळा पैसा बांधकाम व्यवसायात गुंतवल्याच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे कळते.
प्राप्त माहितीनूसार आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येत सोने खरेदी-विक्रीत सहभागी असलेले सराफ व्यापारी आणि ज्वेलर्स प्रतिष्ठानांसह इतर ठिकाणांवर धाडी टाकल्या. कथित व्यवहाराच्या माध्यमातून जमवलेल्या पैशांचा वापर बांधकाम व्यवसायात करण्यात आल्याचा संशय विभागाला आहे. याअनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गाझियाबाद, नोएडा, उत्तर प्रदेशातील लखनऊ, कानपुर तर पश्चिम बंगालमधील कोलकातासह अनेक शहरांमधील १७ ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. आयकर विभागाच्या पथकाने कानपुर येथील दोन व्यावासायिकांच्या घरी पोहचून तपास सुरू केला आहे. राधा मोहन पुरूषोत्तम दास ज्वेलर्स तसेच एमरल्र्ड गार्डन हाउसिंग सोसायटीचे प्रमोटर संजीव झुनझुनवालासह अनेक व्यापारी आणि ज्वेलर्सच्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय मंत्री विजय चौधरींच्या मेहूण्यांच्या घरी ईडी आणि आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली.