नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : यमुना नदीला आलेल्या पुरामुळे दिल्लीतील तीन पाणी प्रकल्प बंद पडले असून यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, पूर पातळी वाढतच असून शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याने नागरिकांची दैना उडाली आहे. आयटीओ, निगम बोध घाट, सिवि्हल लाईन्स, जैतपूर आदी भागात पूरस्थिती गंभीर आहे. ( Delhi Flood )
दिल्लीतील पाऊस थांबला असला तरी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा या राज्यांत पावसाने हाहाकार उडविलेला आहे. हथिनी कुंड बॅराजमधून सातत्याने पाणी सोडले जात असल्याने दिल्लीत यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. वझिराबादमध्ये पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यमुना बॅंक मेट्रो स्थानक तात्पुरते बंद करण्यात आले आहे. मयुर विहार फेस 1 भागात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. याच्या परिणामी वाहतुकीचाही बोजवारा उडालेला आहे. सराय कालेखा भागात गुरुवारी सकाळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शास्त्री पार्क, खजुरी पुश्ता, खजुरी खास आदी भागात अशीच परिस्थिती होती. पुरामुळे वझिराबाद, चंद्रावल तसेच ओखला पाणी प्रकल्प बंद पडल्याने काही भागात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. नदीतील पाण्याची पातळी 208.46 मीटरवर गेली असल्याची माहितीही त्यांनी दिली. पूर क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
दरम्यान हवामान खात्याने दिल्लीसह बिहार, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज असल्याने पहाडी राज्यांतील सि्थती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. दिल्लीत पुराच्या पार्श्वभूमीवर उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना आवश्यक ते निर्देश दिले.
हेही वाचा :