Latest

WTC Final : कसोटी विश्वचषक फायनलमध्ये भारत खेळणार? जाणून घ्या नवे समीकरण…

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका दरम्यानचा तिसरा आणि अंतिम सामना अनिर्णित राहिला आहे. फॉलोऑन मिळून सुद्धा हा सामना ड्रॉ करण्यात अफ्रिका यशस्वी झाला. ऑस्ट्रलिया विरुद्धच्या तीन टेस्ट सामन्यांच्या मालिकेत २ -० ने आफ्रिकेचा पराभव झाला असला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत अखेरचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे आफ्रिकेला थोडासा लाभ झाला आहे. आता या मालिकेनंतर टेस्ट चॅम्पियनशीपची समीकरणे बदलली आहेत. (WTC Final)

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची अंतिम फेरी गाठण्याची लढाई अत्यंत रंजक बनली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सिडनी येथे खेळली गेलेली कसोटी अखेर अनिर्णित राहिली आणि पुन्हा एकदा सर्वच संघाचे समीकरणाची पुन्हा नव्याने मांडणी सुरु झाली. ऑस्ट्रेलिया शिवाय भारत आणि श्रीलंका हे संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याच्या शर्यतीत आहेत. त्याचबरोबर इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचा यांचा प्रवास जवळपास संपल्यात जमा आहे. (WTC Final)

ICC कसोटी चॅम्पियनशिप 2021-23 मधील उर्वरित मालिका (WTC Final)

  • ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा – ४ कसोटी सामने
  • वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिका दौरा – २ कसोटी सामने
  • श्रीलंकेचा न्यूझीलंड दौरा – २ कसोटी सामने

ऑस्ट्रेलियासाठी काय असेल समीकरण

ऑस्ट्रेलियाचे 75.56% गुण आहेत आणि सध्या संघ अव्वल स्थानावर आहे. त्याचे अंतिम फेरीत पोहोचणे जवळपास निश्चित आहे. जर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 4 सामन्यांची मालिका 4-0 ने गमावली आणि त्यानंतर श्रीलंकेने न्यूझीलंडला 2-0 ने पराभूत केले, तरच ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका असेल. तसेच जर ऑस्ट्रेलियाने एक सामना सुद्धा अनिर्णित राखला तर श्रीलंकेच्या आशा संपुष्टात येतील. (WTC Final)

भारतासाठी कसे असेल समीकरण

भारताचे सध्या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 58.93% गुण आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाला 3 – 2 ने पराभूत केले तर अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. भारताने मालिका 3 -1 ने जिंकली तर 62.5% गुण मिळतील. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका 2-2 अशी राहिली आणि श्रीलंकेने न्यूझीलंडला 2-0 ने हरवले तर टीम इंडिया टॉप-2 मधून बाहेर पडेल. यासह जर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेस्ट इंडिजचा 2-0 ने पराभव केला तर भारताला ऑस्ट्रेलिया मालिकेत किमान 21 गुण मिळवावे लागतील. तरच भारताला अंतिम फेरीत स्थान मिळेल.

दक्षिण आफ्रिकेचे काय होणार ?

सिडनी कसोटी अनिर्णित राहिल्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेला झाला आहे. सध्या आफ्रिका 48.72% गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजवर क्लीन स्वीप मिळवल्यास त्यांना 55.56% गुण मिळतील. या नंतर त्यांना आशा बाळगावी लागेल की, श्रीलंका न्यूझीलंडमध्ये केवळ एकच कसोटी जिंकू शकेल किंवा भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ गुणांपेक्षा जास्त गुण घेऊ नयेत.

श्रीलंका अंतिम फेरी गाठू शकेल का ?

श्रीलंकेचा संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर असून त्यालाही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. पण श्रीलंकेला न्यूझीलंडला त्यांच्या घरात जावून क्लीन स्वीप करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारतात एकजरी कसोटी अनिर्णित राखली, तर श्रीलंकेच्या आशा संपुष्टात येतील.
इतर संघांची स्थिती

इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि बांगलादेश या संघांच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जवळपास संपल्या आहेत. भारत आणि श्रीलंका यांनी आपले सर्व सामने गमावले आणि दक्षिण आफ्रिकेने एकही सामना जिंकला नाही तरच इंग्लंड अंतिम फेरीत पोहोचू शकेल.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT