Latest

हमालाचा पोरगा झाला ‘महाराष्ट्र केसरी’; कुस्तीचे ‘जग’ जिंकू पाहणाऱ्या सिंकदरची कमाल

backup backup

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेला अवघ्या १६ सेकंदात आसमान दाखवून पैलवान सिकंदर शेख याने अखेर 'महाराष्ट्र केसरी'चा किताब पटकावला आहे.  पुण्यातील पुलगाव येथे झालेल्या चितपट करीत हा बहुमान त्याने पटकावला.  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये मोहोळचा पैलवान सिकंदर शेख यांनी यंदा महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. दोन वेळा सिकंदर शेखला महाराष्ट्र केसरीच्या किताबाने हुलकावणी दिली होती. परंतु, यंदा मात्र गतविजेता शिवराज राक्षे याला चितपट करत यशाला गवसणी घातली आणि अखेर सिकंदर शेख हा 'महाराष्ट्र केसरी' झाला.

"आज आमची इच्छा पूर्ण झाली, आनंद गगनात मावेना संपूर्ण महाराष्ट्राने माझ्या सिकंदरला प्रेम दिले." 'ना चिंता ना भय , नागनाथ महाराज की जय' अशी घोषणा देत नुकताच महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविलेला सिकंदर शेख यांचे वडील रशीद शेख यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळाल्याचे समजताच मोहोळ नगर परिषदेसमोर नागरिकांनी फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव व जल्लोष साजरा केला. पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मोहोळचा पैलवान सिकंदर शेख याची महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याच्या बरोबर कुस्ती झाली. त्यावेळी पैलवान राक्षे यांच्यावर मात करत सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविला.

त्याचे चुलते शब्बीर शेख म्हणाले, आमच्या गल्लीतील व प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या या विजयात मोठा वाटा आहे.त्यांनी सिकंदरकडे पाचव्या वर्षापासून लक्ष दिले आहे.खुराकासाठी ही सहकार्य केले, प्रोत्साहन दिले.आजही त्यांची मदत होत आहे. सिकंदरच्या घरात सुमारे 200 मानाच्या गदा आहेत. बुलेट गाड्या, जीप गाड्या, कार, ट्रॅक्टर या वस्तू बक्षीस रूपाने मिळाल्या आहेत. आजचा हा सोहळा म्हणजे आमच्या कुटुंबातील सुवर्ण अक्षराने लिहिलेला क्षण म्हणले तरी वावगे ठरणार नाही. यावेळी रमेश बारसकर, वडील रशीद शेख,विनोद कांबळे,मंगेश पांढरे,यशवंत गावडे,तन्वीर शेख,बाबुराव ढाणके,जितेंद्र अष्टुळ, दिनेश गडदे,श्री सलगर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पैलवान सिकंदर शेख याचे चुलते व सर्वच कुटुंबीय यांची परिस्थिती साधारण आहे.सिकंदर शेख यांचे वडील रशीद शेख आज ही मोहोळ शहरातील मोठ्या किराणा दुकानात हमाली करतात. त्यामुळे आपला पोरगा महाराष्ट्र केसरी झाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेना.
सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविला.हे मोहोळ करांना समजताच मोहोळच्या नगर परिषदेसमोर सिकंदरला सुरुवातीच्या काळापासून कुस्तीसाठी सहकार्य केलेले मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी मोहोळ शहरात फटाक्याची आतिषबाजी करत मोठा आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी सिकंदरचे वडील रशीद शेख यांच्यासह शहरातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT