Latest

WPL auction 2024 | अनकॅप्ड खेळाडू ‘वृंदा दिनेश’साठी यूपी वॉरियर्सने मोजले १ कोटी ३० लाख

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : महिला प्रीमियर लीग २०२४ साठी (WPL auction 2024 ) आज (दि.९) मुंबईत खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. यात ऑस्ट्रेलिया पाठोपाठ भारतीय महिला खेळाडूंना सर्वाधिक बोली मिळत आहे. आजच्या लिलावात भारताची अनकॅप्ड खेळाडू वृंदा दिनेश हिने सर्वांना चकित केले. तिला यूपी वॉरियर्सने १ कोटी ३० लाख रुपयांना विकत घेतले. तिची बेस प्राइस १० लाख असताना तिला १३ पटीने अधिक बोली मिळाली.

संबंधित बातम्या 

भारताची अनकॅप्ड फलंदाज त्रिशा पुजिथा हिला गुजरात जायंट्सने तिची बेस प्राइस १० लाख रुपयांना खरेदी केले.

दरम्यान, सुरुवातीच्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना वर्चस्व राखले. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एनाबेल सदरलँड हिला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांना खरेदी केले. तिची बेस प्राइस ४० लाख रुपये होती. सदरलँडला घेण्यासाठी दिल्ली आणि मुंबई यांच्यात चुरस दिसून आली. अखेर दिल्लीने बाजी मारत तिच्यासाठी २ कोटी रुपये मोजले. लिलावकर्ता म्हणून मल्लिका सागर काम पाहात आहेत.

ऑस्ट्रेलियाची फलंदाज फोबी लिचफिल्ड हिला गुजरातने १ कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले. फोबी लिचफील्ड ही २०२४ च्या लिलावात बोली लागलेली पहिली खेळाडू आहे. ही ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. तिची बेस प्राइस ३० लाख रुपये होती आणि तिला गुजरात जायंट्सने १ कोटी रुपयांना विकत घेतले. इंग्लंडची फलंदाज डेनी वायट हिला यूपी वॉरियर्सने बेस प्राइस ३० लाखांमध्ये खरेदी केले.

भारतीय खेळाडू भारती फुलमली आणि मोना मेशराम यांच्यावर कोणीही बोली लावली नाही. त्याचबरोबर भारताची वेदा कृष्णमूर्ती, पूनम राउत, प्रिया पूनिया देखील अनसोल्ड राहिली. देविका वैद्य हिलादेखील कोणी बोली लावली नाही.

ऑस्ट्रेलियन खेळाडू जॉर्जिया वेरहॅमची बेस प्राईस ४० लाख रुपये होती. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने ४० लाख रुपयांना विकत घेतले. भारताच्या मेघना सिंह हिला गुजरात जायंट्सने तिची बेस प्राइसला ३० लाख रुपयांना विकत घेतले. त्याचवेळी श्रीलंकेच्या चमारी अटापट्टूला कोणीही बोली लावली नाही.

इंग्लंडची वेगवान गोलंदाज केट क्रॉस हिची बेस प्राइस ३० लाख रुपये होती. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने केवळ ३० लाख रुपयांना संघात घेतले.

आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी हा लिलाव सुरु आहे. त्यासाठी आज (दि. ९ डिसेंबर) मुंबईत महिला प्रीमिअर लीग २०२४ (WPL auction 2024 ) साठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. एकूण १६५ खेळाडूंनी डब्ल्यूपीएल २०२४ च्या लिलावासाठी नोंदणी केली आहे. यात १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. (WPL 2024 Auction)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT